घाटकोपर येथून अपहरण करण्यात आलेल्या सात वर्षीय मुलीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे शोधण्यात यश आले आहे. ठाण्याचे वाहतूक पोलीस झुबेर तांबोळी यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर अपहरणकर्त्यांचा फोटो पाहिला होता. रविवारी सकाळी त्यांना अपहणकर्ता व अपहृत मुलगी ठाणे रेल्वे स्थानकात दिसल्यानंतर तांबोळी यांनी अपहरणकर्त्यांला पकडत मुलीची सुटका केली.
घाटकोपर पूर्वेच्या कामराज नगरात राहणाऱ्या एका भाजीविक्रेत्याची ७ वर्षीय मुलगी सीमा (नाव बदललेले) २७ मे रोजी घराबाहेर खेळताना बेपत्ता झाली होती. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी तीन विशेष पथके स्थापन केली होती. दरम्यान पोलिसांना घाटकोपर येथे एका दुकानाबाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज हाती लागले होते. त्यात एक तरुण सीमाला घेऊन जात असल्याचे दिसले होते. ‘परिमंडळ ७’चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी हे चित्रण आणि फोटो ‘व्हॉटसअ‍ॅप’वर पाठविण्यास सुरुवात करून माहिती देण्याचे आवाहन केले होते. रविवारी सकाळी ठाण्याच्या कापूरबावडी वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई झुबेर तांबोळी हे पुण्याला आपल्या भावाच्या साखरपुडय़ासाठी जात होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते ठाणे स्थानकात आले. तेव्हा हा संशयित इसम सीमाला घेऊन जात असताना त्यांना दिसला. त्यांनी या तरुणाला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.