अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीवर सर्वत्र उपलब्ध झालेली व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगची सुविधा आता आयफोनवरही उपलब्ध झाली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये दाखल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.
सर्वच अँड्रॉइड मोबाइलधारकांपर्यंत पोहाचलेले व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग आयओएस आणि विंडोजवर कधी येणार, याची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून तंत्रप्रेमींना होती. अ‍ॅपल स्टोअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये ‘आता तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मोफत फोन करा’ अशी सूचना वाचली आणि अ‍ॅपलप्रेमींना दिलासा मिळाला. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगला अँड्रॉइडधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कॉलिंगची सुविधा मोफत दिली असली तरी कॉल केल्यावर डेटा वापराचे दर भरावे लागतात. यामुळे ही सुविधा स्थानिक कॉलिंगसाठी तितकीशी परवडणारी नसली तरी आंतरराज्य आणि आंतरदेशीय कॉलिंगसाठी नक्कीच फायद्याची असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा परिणाम स्काइपसारख्या मोफत व्हिडीओ कॉलिंग सुविधांवर होऊ लागल्याचे चित्र आहे. याचबरोबर आयओएस ८ या ऑपरेटिंग प्रणालीसाठीही व्हॉट्सअ‍ॅप अद्ययावत करण्यात आले आहे. यामुळे फोटो, व्हिडीओ, लिंक आणि इतर गोष्टी केवळ ‘शेअर’ पर्यायाचा वापर करून पाठविणे शक्य होणार आहे. तसेच यामध्ये कॅमेरासाठी क्विक अ‍ॅक्सेस बटणही देण्यात आले आहे. या सर्व सुविधा अँड्रॉइडधारकांकडे यापूर्वीच उपलब्ध आहेत. देशात सध्या सात कोटींहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आहेत. दरम्यान, विंडोज फोनधारकांना व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.