27 September 2020

News Flash

एसटीचे दळणवळण व्हॉट्सअ‍ॅपवरही

लवकरच सेवेत दाखल होणार; अद्ययावत कॉल सेंटरचे उद्घाटन

‘व्हॉट्स-अ‍ॅप’ ( संग्रहीत छायाचित्र )

लवकरच सेवेत दाखल होणार; अद्ययावत कॉल सेंटरचे उद्घाटन

एसटी स्थानक आणि आगारांमध्ये असलेली अस्वच्छता, बसची झालेली दुरवस्था यासह अनेक तक्रारींचा पाढा प्रवाशांकडून नेहमीच वाचला जातो. त्या तक्रारींची फक्त लेखी नोंद ठेवली जात असल्याने तक्रारी सुटण्यास मदत होत नव्हती. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या त्वरित सोडविण्यासाठी एसटी महामंडळाकडून लवकरच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ सेवा सुरू केली जाणार आहे. त्यावर कामही सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

महामंडळाकडून बंद पडलेले ‘फेसबुक पेज’ही सुरू केले जाईल. गेल्या चार वर्षांपासून नुसतीच चर्चा असलेल्या अद्ययावत अशा कॉल सेंटरचे उद्घाटन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले. एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात साधारण आठ वर्षांपूर्वी १८००२२१२५० टोल फ्री हेल्पलाइनचे कार्यालय सुरू करण्यात आले. दूरध्वनीवर प्रवाशांच्या येणाऱ्या तक्रारींची या हेल्पलाइनद्वारे लेखी नोंद घेण्यात येत असे. यासाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र लेखी नोंद ठेवतानाच कर्मचाऱ्यांची दमछाक होत असे. तसेच येणाऱ्या तक्रारी राज्यातील अन्य आगार किंवा स्थानक प्रमुखांपर्यंत पोहोचविल्यानंतर त्या सोडवितानाही बरीच अडचण येत होती. या हेल्पलाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला. मात्र त्याला चार वर्षांत मूर्तरूप देण्यात महामंडळाला अपयशच आले. अखेर अद्ययावत अशा कॉल सेंटरवर काम पूर्ण करून गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.

कॉल सेंटर सुरू करतानाच एसटी महामंडळाकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेज तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एखाद्या बसची स्थिती, आगार आणि स्थानकामंध्ये असलेली दुरवस्था इत्यादींचे फोटो काढून प्रवाशांना ते एसटीच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पेजवर टाकता येतील. त्यासोबतच असलेली माहिती अथवा तक्रारींचीही दखल घेऊन संबंधित विभागाला पाठवण्यात येणार आहे. सोशल मीडियाचा सध्या मोठय़ा प्रमाणात होत असलेला वापर पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तक्रारींचा निपटारा शक्य

१८००२२१२५० क्रमांक असलेले कॉल सेंटर २४ तास प्रवाशांच्या मदतीला राहील. प्रवाशांशी संबंधित चौकशी, तक्रारी, सूचना यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. कॉल सेंटरमध्ये प्रवाशाचा कॉल प्राप्त झाल्यावर प्रथम त्या प्रवाशाचे नाव, दूरध्वनी क्रमांक आणि त्या ठिकाणाची माहिती घेऊन संबंधित विभाग आणि जिल्हा यांची नोंद घेण्यात येणार आहे. चौकशी, तक्रारी आणि सूचना अशा तीन प्रकारांत वर्गीकरण होणार आहे. त्यानंतर संबंधित विभाग आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती देण्यात येईल. कॉल सेंटरवर प्राप्त होणाऱ्या तक्रार त्या विभागाच्या पोर्टलवर दर्शविली जाईल आणि विभागीय वाहतूक, अधिकारी तक्रारीची चौकशी करून तक्रारदारास उत्तर देतील. सात दिवसांत तक्रारींचा निपटारा न झाल्यास त्या तक्रारींची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे एसटीच्या मुख्यालयाला देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2017 1:38 am

Web Title: whatsapp service from st bus
Next Stories
1 ऑनलाइन दहशतवादाचा सामना करण्यासाठी फेसबुकचा पुढाकार
2 मेट्रोचे तिकीट आता अ‍ॅपवर
3 व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली
Just Now!
X