डाऊनलोड करण्याबाबत ‘सायबर महाराष्ट्र’कडून सूचना जारी

व्हॉट्सअ‍ॅपवर, विशेषत: अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या एमपी ४ मीडिया फाईल प्रामुख्याने ध्वनिचित्रफिती डाऊनलोड करू नये, अशी सूचना महाराष्ट्राच्या सायबर विभागाने केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ध्वनिचित्रफितींआडून सायबर हल्ला, हेरगिरी, महत्त्वाचे तपशील मिळवून आर्थिक फसवणूक किंवा अन्य गैरव्यवहार शक्य असल्याचे फेसबुकने १४ नोव्हेंबरला कळविल्यानंतर सायबर महाराष्ट्रने या सूचना जारी केल्या आहेत.

ध्वनिचित्रफितींआड दडलेले मालवेअर किंवा व्हायरस व्हॉट्सअ‍ॅप काही कालावधीसाठी अनियंत्रित करतो. या काळात मालवेअर, व्हायरस भ्रमणध्वनीत स्थिरावतो. असे झाल्यास सेवा नाकारून (डीनायल ऑफ सर्विस) किंवा परस्पर हाताळणीद्वारे (रिमोट कोड एक्झक्युशन) सायबर हल्ला शक्य आहे. यापैकी सेवा नाकारल्याने सेवा पुरवठादारांचे सव्‍‌र्हर कोलमडू शकतात. मोबाइल-इंटरनेट सेवा पुरवठादार, सार्वजनिक किंवा खासगी वाहतूक कंपन्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवठादार अशा हल्ल्यांचे लक्ष्य ठरू शकेल. परस्पर हाताळणी म्हणजे संसर्ग झालेला भ्रमणध्वनी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हॅकर परस्पर हाताळू शकतो. त्यामुळे मोबाइलचा कॅमेरा, कॉल रेकॉर्डिग सुरू करून, संवेदनशील किंवा महत्त्वाचे तपशील मिळवून हेरगिरी, आर्थिक गंडा आदी सहजरीत्या साध्य करू शकतो.

सायबर महाराष्ट्रने सुरक्षिततेचा उपाय म्हणून अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधून व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड करा, अनोळखी व्यक्ती किंवा संपर्क क्रमांकावरून आलेल्या ध्वनिचित्रफिती डाऊनलोड करू नका, ऑटो डाऊनलोड ही सुविधा बंद करा, व्हॉट्सअ‍ॅपचे व्हर्जन अपडेट करा, अशा सूचना केल्या आहेत. अशा प्रकारे सायबर हल्ले होऊ शकतात याची जाणीव जगाला सहा महिन्यांपूर्वी करून देण्यात आली. भारतीय वापरकर्त्यांना मात्र ही बाब पाच दिवसांपूर्वी कळवली, याचे सायबर यंत्रणांमधील अधिकारी, तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.