News Flash

..तर आरे कॉलनीची धारावी होईल!

आरे कॉलनीतील जागा विकास आराखडय़ात समाविष्ट करण्यावरून बरीच मंडळी आक्षेप घेत आहेत. मात्र, मुंबईत मोकळ्या जागेचे नियोजन केले नाही तर काही वर्षांतच त्या जागेवर झोपडपट्टी

| March 13, 2015 04:09 am

आरे कॉलनीतील जागा विकास आराखडय़ात समाविष्ट करण्यावरून बरीच मंडळी आक्षेप घेत आहेत. मात्र, मुंबईत मोकळ्या जागेचे नियोजन केले नाही तर काही वर्षांतच त्या जागेवर झोपडपट्टी उभी राहते. विकास आराखडय़ाच्या माध्यमातून आरे कॉलनीतील हिरवळ जोपासण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे, असे स्पष्ट करत आरे कॉलनीची जागा ‘ना विकास क्षेत्रात’ तशीच सोडून दिली तर २० वर्षांत तेथे धारावीसारखी झोपडपट्टी होऊ शकते, असा परखड इशारा महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिला. तसेच आगामी काळात मुंबईत वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान व मनोरंजन उद्योगाची भरभराट होणार आहे ही दृष्टी ठेवून त्या दृष्टीने शहराचा विकास करण्यासाठी प्रस्तावित विकास आराखडय़ाचा मसुदा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ाबाबत ‘मुंबई प्रेस क्लब’ने चर्चासत्र आयोजित केले होते, त्या वेळी कुंटे बोलत होते. नगररचना तज्ज्ञ व्ही. के. फाटक, ‘टाटा रिअॅल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर’चे व्यवस्थापकीय संचालक संजय उबाळे यांनी त्यात सहभाग घेतला. कुंटे यांनी आरे कॉलनीतील प्रस्तावित विकासकामांवरून सुरू असलेल्या टीकेवर सविस्तर उत्तर दिले. मोकळ्या जागा तशाच सोडून दिल्या तर झोपडपट्टी होते हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी कुंटे यांनी गणपत पाटील नगरचे उदाहरण दिले. दहिसरमध्ये सध्या गणपत पाटील नगर आहे ती संपूर्ण जागा १९९१ च्या विकास आराखडय़ात ‘ना विकास क्षेत्र’ होती. तेथे हिरवळ होती. पण आता त्या जागेवर झोपडपट्टी उभी राहिली आहे. काही नियंत्रणबाह्य़ घटक असतात. एक अधिकारी वा स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकरणांत हतबल होते, असे कुंटे यांनी नमूद केले. तसेच मुंबईत ज्या मोकळ्या जागांमध्ये लोकोपयोगी उपक्रम राबवले त्याच जागा वाचल्या, असाही दावा कुंटे यांनी केला.
आरे कॉलनीतील हिरवळीचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच विकास आराखडय़ात ही जागा समाविष्ट केली आहे. आतापर्यंत विविध सरकारी आस्थापनांसाठी जागा वापरली गेलीच आहे.
 झोपडय़ाही उभ्या राहत आहेत. शैक्षणिक, संशोधन संस्था नियोजनबद्धरीत्या उभ्या करून आंतरराष्ट्रीय दर्जाची उद्याने तयार करून आरे कॉलनीतील हिरवळीचे जतन करता येईल. आरेमधील हिरवळ टिकवण्यासाठी आणखी उपाय लोकांनी सुचवावेत, असे आवाहनही कुंटे यांनी केले. विकास आराखडा हा प्रस्ताव आहे. तो अंतिम नाही. लोकशाही प्रक्रियेनुसार त्याला अंतिम रूप दिले जाईल, असेही कुंटे यांनी नमूद केले. विकास आराखडा संपूर्ण शहरासाठी असून त्यात भाषेनुसार भेद नाही, असा टोलाही कुंटे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता लगावला. शहराबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या सेना-मनसे आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे शहर कसे हवे आहे, त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावे असे त्यांचे मत आहे, याबाबत चर्चासत्र आयोजित करावे, असा सल्ला उबाळे यांनी दिला.

मुंबईतील मोकळी जागा दुप्पट करण्याचे लक्ष्य
मुंबईत सध्या मोकळ्या जागेचे प्रमाण माणशी १.०९ चौरस मीटर इतके आहे. प्रस्तावित विकास आराखडय़ात ते २ चौरस मीटपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती नगर नियोजन तज्ज्ञ फाटक यांनी दिली. मुंबईतील लोकसंख्या व जागेची निकड लक्षात1 घेऊनच एफएसआय वाढवण्याचे सुचवण्यात आल्याचेही फाटक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 4:09 am

Web Title: when are colony will turn in to dharavi
Next Stories
1 परवडणाऱ्या घरांसाठीच जादा एफएसआय
2 अजितदादा बदलले ..
3 नवी मुंबईतील २० हजार घरे अधिकृत
Just Now!
X