बारावी आणि दहावीची अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्च २०१४ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने ही प्रक्रिया ऐन दिवाळीत सुरू होणार की काय, अशी भीती शिक्षकांना वाटू लागली आहे. यातच यंदा ही प्रक्रिया ऑनलाइन होण्याची चिन्हे असल्याने शिक्षकांमध्ये अधिकच तणाव निर्माण झाला आहे.
दर वर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते, पण यंदा ही प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने शाळांना चिंता वाटू लागली आहे. जर ही प्रक्रिया लांबली आणि ती ऑनलाइन पद्धतीने होणार असेल तर खरोखरच कठीण जाईल, असेही शिक्षकांचे मत आहे. ऑक्टोबर महिना उजाडला तरी प्रक्रिया सुरू न झाल्याने अनेक पालकांनी शाळांमध्ये येऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
जर ही पद्धत ऑनलाइन झाली तर राज्यातील प्रत्येक शाळेला स्कॅनर, प्रिंटर, वेबकॅम आणि इंटरनेट जोडणी करून घेणे बंधनकारक राहील. इतक्या सोयी अल्पावधीत करणे मुख्याध्यापकांना फार अडचणीचे होणार आहे. आणखी एक बाब म्हणजे याचे शिक्षकांना जर योग्य प्रशिक्षण नसेल तर आणखीनच खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. मुळात या वर्षी अभ्यासक्रमापासून दहावीची मूल्यमापन पद्धतीही बदलली आहे. त्यामुळे आधीच शिक्षक व मुख्याध्यापक तणावात आहेत. यातच अर्ज भरण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने दुसऱ्या सत्रात फारच कमी वेळ मिळणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ याबाबत दिरंगाई का करत आहे, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी उपस्थित केला आहे. ही प्रक्रिया लांबल्यामुळे शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे, पण प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने पालकांवरचा ताण वाढला असून ते शाळेत येऊन मुख्याध्यापकांना प्रश्न विचारत असल्याचेही ते म्हणाले. मंडळाचे पुणे मुख्य कार्यालय तसेच मुंबई विभागीय कार्यालय यांच्याशी संपर्क साधला असता कोणतेही समर्पक उत्तर मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात लवकरच आदेश काढण्यात येतील आणि ही प्रक्रिया सुरू होईल. बारावीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून दहावीचीही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे विचाराधीन आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे यांनी स्पष्ट केले.