अवघ्या देशाचे हृदय पिळवटून सोडणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अशा गुन्ह्य़ांतील आरोपींना फाशीसारखी कडक शिक्षा करण्याची मागणी तीव्र होत असतानाही महिलांवरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. स्त्री भ्रूणहत्या, विनयभंग, छेडछाड, बलात्कार अशा घटनांनी कलंकित झालेले २०१२ हे वर्ष संपवून आलेले नववर्ष महिलांच्या सुरक्षिततेची नवी पहाट घेऊन येईल, ही आशा फोल ठरवणाऱ्या पाच घटनांनी मंगळवारी महाराष्ट्राला हादरवून सोडले. नववर्ष स्वागताच्या जल्लोषादरम्यानच मुंबईत एका विवाहितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला; तर पुण्यात सहा वर्षांची चिमुरडी नराधमाच्या विकृतीची शिकार बनली. अकोल्यामध्ये एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली, तर ठाण्यात एकतर्फी प्रेमातूनच तरुणीवर हल्ला केल्याची घटना घडली.
गुंडाच्या त्रासाने अकोल्यात
तरुणीची आत्महत्या
 गेल्या अनेक दिवसांपासून अकोला परिसरातील गुंडाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रोशनी राजकुमार वाढवे या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे केली.  जुन्या शहरातील भगीरथ वाडी या भागात ही घटना घडली. आरोपी चंद्रकांत बोरकर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोशनीला चंद्रकांत बोरकर त्रास देत होता. तिचा पाठलाग करणे, तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधणे, अश्लील भाषेत संवाद करणे, असे उद्योग चंद्रकांत बोरकर याने सुरू केले होते. तिच्या भावास जीवे मारण्याची धमकीही बोरकर याने दिली होती. रोशनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असा स्पष्ट उल्लेख नमूद आहे. चंद्रकांत बोरकरच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे रोशनीने चिठ्ठीत लिहिले आहे.  
जुहू चौपाटीवर विवाहित महिलेचा विनयभंग
 नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी जुहू चौपाटीवर जमलेल्या गर्दीचा फायदा घेत एका मद्यपीने एका विवाहित महिलेचा विनयभंग केला.  दरवर्षी ३१ डिसेंबरला जुहू चौपाटीवर नववर्षांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने नागरिक येत असतात. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते. यावेळी एक २९ वर्षीय विवाहित महिला पतीसह आली होती. रात्री दीडच्या सुमारास ती चौपाटीवर फिरत असताना गर्दीचा फायदा घेत हैदर अली अजीझ या इसमाने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने त्वरीत आरडाओरडा केला. उपस्थित लोकांनी त्याला बदडत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हैदर अली मद्याच्या नशेत होता, अशी माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण चव्हाण यांनी दिली.
सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार
 पुण्यातीला हडपसर भागात मंगळवारी सकाळी सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. घटनेच्या ठिकाणाजवळ एका बंगल्यात लावलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणात एक तरुण दिसत असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित मुलगी मूळची सोलापूरची असून पाच दिवसांपूर्वीच हडपसर येथे आपल्या मावशीकडे आली होती. ती सकाळी आपल्या चार वर्षांच्या मावसबहिणीसोबत प्रात:र्विधीसाठी जात असताना तेथे आलेल्या एका व्यक्तीने तिला बळजबरी उचलून नेले व हाताने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. लहान बहिणीने हा प्रकार घरात जाऊन सांगितल्यानंतर तिच्या घरातले त्या ठिकाणी धावून आले. त्यावेळी ती मुलगी मैदानात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात तरुणाचा शोध सुरू आहे.  
मुलीला बापाकडून मारहाण
पुण्यातील थेरगाव येथील पवना नगर येथे मुलगा न झाल्यामुळे सतत पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीने आपल्या चौदा महिन्याच्या मुलीस लाटण्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दस्तगीर नझीर हुकेरी (वय ३०, पवनानगर, थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. तसेच झिया हिची आजी सलीमा हुकेरी, आत्या शबाना शेख आणि शिरीन शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.