देशात करोनाची लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. राज्यातही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुंबईतही रुग्णवाढीचा दर कमालीचा घटला आहे. मात्र असं असलं तरी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा द्यायची की नाही यावर पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात काय निर्णय होईल याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून आहे.”मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सध्या लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. ही सेवा सर्वसामान्यासाठी सुरु करायची की नाही याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. हे सर्व मुंबईतील करोनास्थितीवर अवलंबून आहे”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत २२ मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली. काही महिन्यांनंतर सर्वसामान्यांना वेळेची मर्यादा घालून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पुन्हा एकदा सामन्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय दर आठवड्याला घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे तर हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी नवं धोरण; कुणाला मिळणार मोफत लस; खासगी रुग्णालयात घेतल्यास किती पैसे लागणार?

मुंबईत मागच्या २४ तासात ७२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९८० रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत १५ हजार ७८६ सक्रीय करोना रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ५५० दिवसांवर पोहोचला आहे. ३१ मे ते ६ जूनदरम्यान करोना रुग्णवाढीचा दर हा ०.१२ टक्के इतका होता.