पत्री पूल आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच होऊन बसलं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जास्त काळ पत्री पुलाच्या समस्येने कल्याण डोंबिवलीकर त्रासले आहेत. जुना पत्रीपूल पाडण्यात आला. त्यामुळे सगळा भार नव्या पुलावर आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच होऊन बसली आहे. दहा मिनिटांचं अंतर कापण्यासाठी कधी कधी दीड तास लागतो. त्यामुळे कल्याणचा पत्रीपूल कधी उभारला जाणार? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. अशात कल्याणच्या ‘गली बॉय’ने म्हणजेच रवि सिंग या रॅपरने एक रॅप साँग तयार करुन पत्री पूल कब बनेगा? हा प्रश्न विचारला आहे.

आपल्याला ठाऊक आहे काही दिवसांपूर्वीच आलिया भट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला गली बॉय हा सिनेमा आपल्या भेटीला आला होता. रॅपर डिव्हाईनची ही कहाणी होती. या सिनेमाचं आणि त्यातल्या रॅपचं चांगलंच कौतुक झालं. हीच कल्पना वापरुन कल्याणच्या रॅपरने पत्री पूल कब बनेगा हे रॅप साँग तयार केलं आहे. ‘ सिधा कल्याणसे.. ‘ असं म्हणत एक हिंदी रॅप साँग हे या रॅपरने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

पाहा व्हिडीओ

गली बॉय या सिनेमातलं अपना टाइम आयेगा हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्याच धर्तीवर कल्याणच्या रॅपरने पत्री पूल कब बनेगा? हा प्रश्न उपस्थित करत एक रॅप साँग तयार केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी या गाण्याच्या लिंकखाली कमेंट करत आता तरी पत्री पूल होणार का नाही हे आणि या आशयाचे प्रश्नही विचारले आहेत. पत्री पुलामुळे कल्याण डोंबिवलीकरांना होणाऱ्या त्रासाची कल्पना या रॅपरने प्रशासनालाही देण्याचा प्रयत्न केला आहे.  कल्याणकारांची समस्या अनोख्या पद्धतीने या रॅप साँगद्वारे मांडण्यात आली आहे.