शालेय शिक्षणात निरनिराळे प्रयोग राबविणाऱ्या अनेक शाळा आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत, मात्र या प्रयोगशील बेटांमध्ये नेटवर्किंग होणं आणि मुख्य प्रवाहातील शाळांनी या प्रयोगांची दखल घेण्याची आवश्यकता ‘कुठे आहेत आजची शांतिनिकेतनं?’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळा जर शांतिनिकेतन बनल्या तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा उंचावला असं म्हणता येईल, अशी भावना या व्यासपीठावर व्यक्त झाली.
‘दै. लोकसत्ता आणि सारस्वत बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातील तिसऱ्या सत्रात ‘कुठे आहेत आजची शांतिनिकेतनं?’ या विषयावर परिसंवाद झाला. यात वंचित मुलांसाठी चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् सुरू करणारे गिरीश प्रभुणे, कोकणात दापोली येथील चिखलगावी लोकमान्य टिळक धर्मादाय न्यासाअंतर्गत शाळा सुरू करणाऱ्या रेणू दांडेकर आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे सहभागी झाले होते. या सत्राचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी केले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् सुरू केल्यानंतर आलेले विविध अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे या शाळेच्या रचनेत आणि शिक्षणात बदल कसे करण्यात आले, ते प्रभुणे यांनी उलगडून सांगितले. विविध सामाजिक स्तरातील वंचित मुलांना शिक्षण मिळावे, म्हणून सुरू करण्यात आलेल्या या शाळेत सुरुवातीच्या काही दिवसांत मुलं मात्र रमली नाहीत. कारण शाळेचं शिक्षण आणि मुलांचा जीवनक्रम यांच्यात साम्य नव्हतं. त्यांच्या दैनंदिन जगण्यापासून हे शिक्षण त्यांना दूर नेणारं होतं आणि म्हणून ही मुलं शिकायचा कंटाळा करत. मात्र, यावर कशी मात करायची हे अनुभवाने लक्षांत आले.  कुठल्याही औपचारिक शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुलांकडे प्रत्यक्षात मात्र माहितीचा खजिना असल्यामुळे त्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यास सुरुवात झाली. आज ही मुलं सुतारकाम, वेल्डिंग, प्लम्बिंग, तोलणं-मापणं, लोहारकाम, गवंडीकाम, राहुटय़ा उभारणं या कामात तरबेज बनत आहेत. वेगवेगळी भस्मं, विविध काढे बनवू लागली आहेत. शाळेचं निम्मं बांधकाम मुलांनीच केलंय. दरवाजे, खिडक्या, कडी-कोयंडे मुलं शिताफीनं बसवतात, इंग्रजीचा सराव करतात, इंटरनेटवरून अधिक माहिती घेत मुलं आपलं ज्ञान समृद्ध करतात, पक्षी, वनस्पती यांच्या सचित्र कोशाचं काम सुरू आहे, अशी माहिती प्रभुणे यांनी अभिमानाने दिली. मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांच्या सहभागाने या शाळेत वेगवेगळे उपक्रम योजले जातात.
रेणूताई दांडेकरांच्या हृद्य मनोगताने उपस्थित हेलावून गेले. ‘एकदा सातवीच्या वर्गातल्या मुलांना गुरूदेवांच्या शांतिनिकेतनबद्दल सांगितलं तेव्हा मुलांनी ‘म्हणजे तिथली मुलं दंगामस्ती, गोंधळ करत नाहीत का? असं विचारलं. त्यावर शिक्षकांनी ‘हो, करतात की!’ असं उत्तर दिलं. मग तर ‘त्या शाळेचं नाव मनसोक्त निकेतन हवं!’ असं मुलांनी सुचवलं. काही दिवसांनी त्यांनीच मुलांना विचारलं, ‘खूप दंगा-मस्ती हुंदडणं केल्यावर कसं वाटतं?’ यावर मुलं उत्तरली, ‘शांत- शांत वाटतं.’ मग, म्हणूनच टागोरांनी त्या शाळेला शांतिनिकेतन म्हटलं होतं..’ असे त्यांनी स्पष्ट केले आणि ते मुलांना पटलेही. रेणूताईंनी आपल्या मनोगताची सुरुवात या किश्याने केली.
जगताना शिकायचं आणि शिकत शिकत जगायचं, यावर विश्वास असणारी त्यांची शाळा. शाळेतील वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘जेव्हा शाळेबाबत यंत्रणा हा शब्द शिरतो, तेव्हा त्यात राबविणारा आणि राबणारा असे दोन घटक येतात. त्यामुळे यंत्रणेऐवजी रचना हा शब्द वापरायला हवा.’
राज्या सरकारच्या बंधनांमुळे प्रयोगशील रहाता येत नाही हा आक्षेप त्यांनी फेटाळला. आमची शाळा शासनमान्य अनुदानित शाळा आहे आणि तरीही त्यात अनेक प्रयोग होतात. आमच्या शाळेत इयत्ता नाहीत. मराठी, हिंदूी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान असे विषयांचे वेगवेगळे विभाग आहेत. तासिकांना मुलं त्या त्या विभागात जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या शाळेत ऑइलपेंटने रंगवलेल्या भिंतींऐवजी ‘अभिव्यक्ती फलक’ आहेत. शासननिर्णय, यंत्रणेतील त्रुटी आणि कामांचे ओझे या भयात काम करण्याची सवय आज शिक्षकांना लागली आहे. नोंदी, जबाबदारी याहीपेक्षा ‘माझी मुलं हा माझा आरसा आहे,’ हे शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवं. ‘हे हृदयीचं ते हृदयी’ अशा तऱ्हेने शिकवणं व्हायला हवं.
शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी आज शिक्षणव्यवस्थेतील आव्हाने आणि त्यावरील उपाय यांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, आपल्याला जाणवणाऱ्या शिक्षणसमस्येचे तीन टप्पे आहेत. ते असे- सर्व मुलं शाळेत येती करणं, शाळेत ती टिकती करणं आणि मुलं शिकती करणं. तिसऱ्या टप्प्यात अपेक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेपासून आजही आपण दूरच आहोत. आज कित्येक शाळांमध्ये धड शौचालयेही नाहीत, तर मुलांना जेवण कसले देता?, असा संतप्त सवाल पानसे यांनी केला.
सरकारी अधिकारी सरसकट निरुत्साही नसतात से सांगताना त्यांनी मात्र, वाई, साताऱ्यातील भराडे मॅडम अथवा जाधव सरांसारख्या गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी तिथल्या शिक्षणव्यवस्थेत मूलभूत आणि क्रांतिकारी बदल घडत असल्याचे नमूद केले. जिथे मुक्तता असते, तिथे शिक्षण फुलते. जर शिक्षण शासनमुक्त झालं, तर प्रत्येक शाळा ही शांतिनिकेतन होईल..’ या पानसे सरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाने या परिसंवादाची सांगता झाली.

..आणि मुलं आवडीने शिकू लागली – गिरीश प्रभुणे
या वनवासी मुलांना पक्ष्यांचे आणि त्यांना हाक देण्याचे विविध चित्रविचित्र आवाज काढता येत, म्हणूनच शिकताना पक्षी, प्राणी त्यांच्या जवळ येतात, असं शिक्षकांच्या लक्षात आलं. अनुभवाने ‘आपण या मुलांना सुधारायला आणि शिकवायला आलो आहोत,’ हा शिक्षकांचा इगो गळून पडला आणि मुलांना काय शिकायला आवडेल, याचा नव्याने विचार सुरू झाला आणि मुलं आवडीने शिकू लागली.

उपाय आपणच शोधायला हवेत – रमेश पानसे
आज शिक्षणविषयक प्रश्न हे व्यक्तिगत, शिक्षकांचे, संस्थाचालकांचे, शाळांचे, समाजाचे, पालकांचे असे वेगवेगळ्या पातळीवर भेडसावत आहेत. मात्र, प्रत्येक प्रश्न शासन सोडवेल, हे गृहितक आता बाजूला ठेवायला हवे आणि उपाय आपले आपण योजायला हवेत.

शिक्षकांनी आपले ‘शिक्षण’ बाजूला ठेवण्याची गरजरेणू दांडेकर
एकदा आठवीच्या मुलाला मी विचारलं, ‘काय वाचतोस?’ त्यावर त्याने उत्तर दिलं, ‘खूप सारं. मला आमचं शेत वाचता येतं. नदी वाचता येते. झाडं वाचता येतात.’ म्हणूनच जेव्हा शिक्षक त्यांचं झालेलं शिक्षण आणि त्यांच्या गुणवत्तेच्या फूटपट्टय़ा बाजूला ठेवतील, तेव्हा ते मुलांना शिकवू शकतील.

पारंपरिक पद्धतीची शिकवण आधुनिक जगात मर्यादित प्रमाणात जगण्याने साध्य होऊ शकते. मात्र अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड घालूून अनुभवाच्या आधारावर शिक्षण अभ्यासक्रम आखल्यास त्याची मदत होऊ शकते. सध्याच्या युगात पालक भरकटले आहेत. त्यांना स्पर्धेची भीती वाटते. एकच मूल असले तर त्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तो मध्यममार्ग  स्वीकारतो. पण शेतकऱ्यांना जसे बियाणे कळते तसे पालकांना  त्यांच्या पाल्यासाठी काय चांगले आहे, हे कळते. प्रयोगशाळांनी त्यांच्यासमोर जायला हवे. चांगले पर्याय उपलब्ध नसल्याने असलेल्या पर्यायांचाच ते विचार करतात, असे सांगत पानसे यांनी मध्यमवर्गाची भूमिका स्पष्ट केली.

शिक्षणात व्यवसाय शिक्षण, निसर्गशिक्षण, नैसर्गिक संपत्ती या सगळ्याचा विचार व्हायला हवा. ग्रामीण स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याकडे पाहायला हवे. आमच्या शाळेतील मुलं रक्तगट तपासू शकतात. गर्भारपणााची रक्तचाचणी करू शकतात. प्रथमोपचार करू शकतात. शाळेतील दरवाजे, खिडक्यांचं फिटिंग मुलंच करतात. ४०० ट्रकचा भराव घालून आमच्या मुलांनी मैदान तयार केलं आहे. बालमजुरी रद्द व्हावी, पण मुलांना श्रम करायला मात्र शिकवायला हवे. बुद्धी, हात आणि श्रम ही बलस्थाने जेव्हा ‘शाळा’ या संकल्पनेत समाविष्ट होतील, तेव्हा शाळा शांतिनिकेतनं बनतील,’ असा विश्वास रेणूताईंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.