एलफिन्स्टन पूल दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सगळ्या पुलांचे ऑडिट का केले गेले नाही? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, पुलाचे ऑडिट झाले असते तर लोकांचा नाहक बळी गेला नसता या मृत्यूंना कोण जबाबदार आहे असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.

गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी असलेला पादचारी पूल कोसळला. या घटनेत पाच जण ठार तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार आणि महापालिकेवर निशाणा साधला आहे. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.