वक्तृत्वाच्या तेजस्वी परंपरेचे आणि कलेचे पुनरुज्जीवन व्हावे, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. ‘नाथे ग्रुप्स’ची प्रस्तुती असलेल्या या विशेष स्पर्धेतून महाराष्ट्राचा ‘वक्तादशसहस्र्ोषु’ निवडला जाणार आहे.
ही स्पर्धा राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून ती १६ जानेवारी २०१५ पासून मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी होणार आहे. या प्रत्येक केंद्रातून प्रत्येकी दोन विभागीय विजेते निवडले जाणार आहेत. स्पर्धेचा वयोगट १६ ते २४ वर्षे असा असून ५ ते १२ जानेवारी या कालावधीत प्रवेशिका दाखल करायच्या आहेत. एका महाविद्यालयातून जास्तीतजास्त दोनच प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. विभागीय अंतिम फेरी २८ जानेवारी रोजी आणि महाअंतिम फेरी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. चांगला वक्ता दहा हजारांत एखादाच आढळतो, असे म्हटले जाते. महाराष्ट्राने आजवर अनेक उत्तमोत्तम ओजस्वी वक्ते दिले आहेत. एक काळ असा होता की, राजकारण असो की कला वा वाङ्मय, समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम वक्ते सहज दिसून येत. मात्र काळाच्या ओघात वक्तृत्वाची ही देदीप्यमान परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली आहे. या परंपरेचे पुनरुज्जीवन व्हावे आणि चांगले वक्ते घडावेत, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे महाअंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांना विविध क्षेत्रांतील वक्त्यांचे खास मार्गदर्शन मिळणार आहे. त्यातून त्यांचा महाअंतिम फेरीतील भाषणाचा विषय नक्की केला जाणार आहे. स्पर्धेसाठीचे भाषणांचे विषय आणि सविस्तर नियम, अटी आदी तपशील लवकरच ‘लोकसत्ता’मधून जाहीर केला जाईल.