महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या तीन मे रोजी संपणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री काय घोषणा करतात? याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. करोनाचा मोठया प्रमाणावर प्रादूर्भाव असलेल्या भागांमध्ये लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी लॉकडाउनचा फायदा झाला असा दावा त्यांनी केला. “लॉकडाउन नसता तर कल्पना करु शकत नाही, असा करोना विषाणूचा गुणाकार होऊन रुग्ण संख्या वाढली असती. लॉकडाउनमुळे करोना विषाणूचा गुणाकार नियंत्रणात ठेवणे शक्य झाले” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“लॉकडाउन असतानाही करोना रुग्णांची संख्या कशी वाढतेय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुख्य म्हणजे पहिल्यांदा करोना व्हायरची लागण झालेले रुग्ण ज्या भागामध्ये सापडले, तिथे त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना बाधा झाली. कंटेनमेंट झोन जे आहेत, जे आपण सील केलेत तिथे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोनाच्या ७५ टक्के रुग्णांणध्ये सौम्य, अतिसौम्य आणि लक्षणेच दिसत नसलेले रुग्ण आहेत. पण ते करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना सुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे. कारण लक्षणे दिसत नसली तरी करोना विषाणूचे ते वाहक ठरु शकतात असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
.