राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे. मात्र, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं. मात्र, अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्वासच का ठेवला? असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.

भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांचे समर्थन घ्यायला नको होते. अजित पवारांचा पाठींबा घेण्यावरुन भाजपाचे नेते उलट-सुलट उत्तर देत आहेत. अमित शाह यांनी म्हटले की, विधीमंडळ नेता असल्याने भाजपाने अजित पवारांवर विश्वास ठेवला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपण योग्य वेळी उत्तर देऊ असे सांगत यावर मौन बाळगले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शाह म्हणाले, आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो तर अजित पवाराच आमच्याकडे आले होते. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडले गेले होते. सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भाजपाचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशीच चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती, तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदारांच्या पाठींब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांची स्वाक्षरी होती. दरम्यान, अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद करण्यात आल्याच्या वृत्तावर ते म्हणाले, असे कुठलेही खटले मागे घेण्यात आलेले नाहीत.