मुंबईत सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने त्यासाठीची संमती नाकारली. ज्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. नवरात्र सुरु आहे.. अशात आपल्या राज्यातील माता भगिनींना लोकल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार इच्छुक आहे. मात्र रेल्वे बोर्ड त्यासाठी टाळाटाळ करतं आहे. यामागे भाजपा नेत्यांचा दबाव आहे. भाजपा या घाणेरड्या राजकारणात नवरात्र सुरु आहे हा मुद्दाही दुर्लक्षित करते आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सचिन सावंत?

“मुंबई आणि उपनगरांमधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून आम्ही नवरात्राच्या आदल्या दिवशी सरसकट महिलांना प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. हा निर्णय राज्य सरकारने एकट्याने नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच घेतला होता. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत आमच्या चार बैठका झाल्या. सप्टेंबर महिन्यात एक बैठक झाली, ९ ऑक्टोबरला एक बैठक झाली. त्यानंतर १३ ऑक्टोबरच्या दिवशी दोन बैठका झाल्या. त्यातली एक बैठक मुख्य सचिव आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झाली. दुसरी बैठक महापालिका अधिकारी आणि रेल्वे बोर्ड यांच्यात झाली. अडीच तास चालेल्या या बैठकीत विविध मुद्दे चर्चिले गेले. सुरक्षेचे निकष कसे पाळता येतील यावर सविस्तर चर्चा झाली. सगळ्यांशी चर्चा करुनच महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र १६ तारखेला जेव्हा आदेश काढण्यात आला तेव्हा रेल्वे बोर्डाने हात वर केले. त्यामागचं कारण काय हे अद्याप माहित नाही. भाजपाच्या दबावाखाली येऊनच रेल्वे बोर्ड संमती नाकारतं आहे” असाही आरोप सचिन सावंत यांनी केला.

दरम्यान आज राज्यसरकारने रेल्वे बोर्डाला पुन्हा एकदा पत्र लिहून महिलांना प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे. मात्र त्यावरही रेल्वे बोर्डाने काहीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे महिलांना रेल्वे प्रवास नेमका कधी करता येणार हा प्रश्न कायम आहे.