मुंबईतील वीजग्राहकांसाठी घेण्यात येणाऱ्या सौरऊर्जेसाठी टाटा पॉवरला मंजूर केलेल्या दरापेक्षा अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीस प्रति युनिट ६५ पैसे अधिक मंजूर करण्यात आले असून अदानीची सौरऊर्जा महाग का, असा सवाल करत अदानीला दिलेला वाढीव दर रद्द करण्याची मागणी राज्य वीज आयोगाकडे करण्यात आली आहे.

वीज वितरण कंपनीला आपल्या भागातील वीजपुरवठय़ासाठी वीजखेरदी करण्यासाठीचा दर राज्य वीज नियामक आयोगाला सादर करावा लागतो. अपारंपरिक क्षेत्राच्या विजेसाठी वीज आयोगाच्या निकषांनुसार प्रक्रिया पार पाडावी लागते. याबाबत निर्णय देताना वीज आयोगाने टाटा पॉवरच्या तुलनेत अदानीला अतिरिक्त ६५ पैसे मंजूर केल्याचा आक्षेप काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी राज्य वीज नियामक आयोगाला पत्र लिहून के ला आहे. टाटा पॉवरला २२५ मेगावॉट सौरऊर्जेच्या खरेदीसाठी प्रति युनिट २.५९ रुपये दर मंजूर झाला. तर अदानीला मुंबई उपनगरातील वीजग्राहकांसाठी हायब्रिड सौरऊर्जा प्रकल्पातील खरेदीसाठी ३.२४ रुपये प्रति युनिट असा दर मंजूर झाला, याकडे लक्ष वेधत या तफावतीवर शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबईकरांवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी अदानीला मंजूर केलेला ३.२४ रुपयांचा दर रद्द करावा आणि अदानीलाही टाटा पॉवरला मंजूर केलेला २.५८ रुपये प्रति युनिट हा दरच लागू करावा, अशी मागणी शर्मा यांनी राज्य वीज नियामक आयोगाला पाठवलेल्या पत्रात के ली आहे. टाटाच्या सौरऊर्जा प्रकल्पातील विजेच्या तुलनेत अदानीच्या हायब्रिड सौरऊर्जा प्रकल्पातील विजेसाठी प्रति युनिट ६५ पैसे जास्त दर दिल्याने मुंबईतील वीजग्राहकांवर वर्षांला २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे वीज आयोगाने अदानीच्या प्रकल्पाला मंजूर केलेला वाढीव दर रद्द करून त्यांनाही टाटाला मंजूर केलेला दरच द्यावा, अशी मागणी वीज आयोगाकडे के ली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने त्यावर कार्यवाही न केल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

अदानी कंपनीकडून प्रतिक्रियेस नकार

या संदर्भात अदानी कंपनीच्या प्रवक्त्याशी लागोपाठ दोन दिवस संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.