ठाण्यातील थायरोकेअर टेक्नोलॉजी ही खासगी प्रयोगशाळा करोना चाचण्या करू शकत नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला केली. तसेच प्रयोगशाळेची बाजू ऐकल्यानंतर एका आठवडय़ात कारणमीमांसा करणारा आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या प्रयोगशाळेविरोधात माहिती मिळाल्यानंतर ठाणे पालिकेने जनहितार्थ या प्रयोगशाळेत करोना चाचणी करण्याचे थांबवले. प्रयोगशाळेविरोधात तसा आदेशही पालिकेने काढला. त्याला खूप वेळ उलटून गेला आहे. परंतु परिस्थिती आणि परिणाम लक्षात घेता प्रयोगशाळेची बाजूही ऐकायला हवी, असे सकृद्दर्शनी वाटत असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच प्रयोगशाळेत करोना चाचणी सुरू करण्यात येणार की पालिका आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याबाबतचा अंतिम निर्णय पालिके ने घ्यावा. मात्र तो घेण्यापूर्वी पालिकेने थायरोकेअरची बाजू ऐकावी. त्यानंतरच कारणमीमांसा करणारा निर्णय जाहीर करावा, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले.

थायरोकेअरने पालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. २१ मे रोजी पालिके ने थायरोके अरला करोना चाचण्या बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती. पालिकेने आपली बाजू न ऐकताच करोना चाचणी थांबवण्याचा अचानक निर्णय जाहीर केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता.