दोन महिने आगाऊ सूचना करूनही डासप्रतिबंधक उपाययोजना न केल्याने एमएमआरडीए, पश्चिम रेल्वे, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सविरोधात महापालिका कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलत आहे. त्याचप्रमाणे डासांची वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला लोअर परेल येथील मधुसूदन मिलचे बांधकाम तोडण्यास सांगितले आहे.
चार वर्षांपूर्वी, २०१० मध्ये मुंबईत मलेरियाचा उद्रेक झाल्यावर पालिकेने डासप्रतिबंधक उपाययोजनांची मोहीम हाती घेतली. त्यानुसार वेगवेगळ्या संस्थांच्या परिसराची पाहणी करून डास वाढण्यास कारणीभूत ठरत असलेले पाणवठे तसेच पाणी साठणाऱ्या इतर वस्तूंची वासलात लावणे, डासप्रतिबंधक फवारणी आदी उपाय करण्याची सूचना पालिकेकडून करण्यात येते.  मे महिन्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर काही ठिकाणी पाणी साठण्याची ठिकाणे आढळली. या परिसरात डासप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या. ‘मान्सूनच्या पूर्वतयारीसाठी पालिकेच्या मुख्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व संबंधित संस्थांना बोलावण्यात आले. त्यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण आले नसल्याने या संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख म्हणाले.