अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतला. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या विषयावरही त्यांनी मत मांडलं. कंगनाने हिमाचल प्रदेशमधून ड्रग्सविरोधातील लढा सुरू करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

“संपूर्ण देशासमोर ड्रग्सचं मोठं आव्हान आहे. पण तिला (कंगना) हे ठाऊक आहे का, ड्रग्सचं मूळ हिमाचलमध्ये आहे. त्याविरोधातील लढा तिने आधी तिथूनच सुरु करावा”, असं उर्मिला मातोंडकर ‘मुंबई तक’शी बोलताना म्हणाल्या. कंगना रणौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरुन उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला. जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली अशी विचारणा त्यांनी केली.

आणखी वाचा- कंगना खोटारडी! काय बोलली होती तिच्या लक्षात नाही- उर्मिला मातोंडकर

कंगनाच्या मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून त्या पुढे म्हणाल्या, “मुंबई प्रत्येकाचीच आहे यात काही शंका नाही. या शहराची एक मुलगी म्हणून मी याविरुद्ध केलेली कोणत्याही प्रकारची बदनामीकारक टीका सहन करणार नाही. जेव्हा अशी टिप्पणी केली जाते, तेव्हा तुम्ही केवळ शहराचा अपमान करत नाहीत तर संपूर्ण राज्याचा अपमान करता.”

आणखी वाचा- जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी? उर्मिला मातोंडकर कंगनावर संतापली

“काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, इंडस्ट्रीने कित्येक जणांना त्यांचं घर, भाकर सगळं काही दिलं आहे,” असंही उर्मिला म्हणाल्या.