शिवाजी पार्कचा परिसर शांतता क्षेत्र असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला कशी काय परवानगी देण्यात आली, असा प्रश्न मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. त्याचबरोबर बुधवारी आपली बाजू मांडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. उद्या या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावरच मनसेच्या पहिल्या गुढीपाडवा मेळाव्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
येत्या शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा पहिलावहिला गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येते आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या मेळाव्यासाठी लाऊडस्पीकर लावण्यात येणार आहेत. शिवाजी पार्कचा परिसर शांतता क्षेत्र असताना तिथे लाऊडस्पीकर लावण्याला परवानगी कशी काय देण्यात आली, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणी बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला जातो. या मेळाव्याप्रमाणेच आता मनसेकडूनही गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.