भिवंडी येथील कासारआळी भागात महिनाभरापूर्वी व्यापारी दिलीप जैन यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी पायल हिच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली. दिलीप आणि पायल या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर पतीची मालमत्ता मिळणार नसल्याने पायलने मोलकरीण मंजुळादेवी गोमतीवाल आणि तिचा भाऊ पप्पू ऊर्फ लक्ष्मण यांच्यामार्फत दिलीप यांच्या खुनासाठी १० लाखांची सुपारी दिल्याचे चौकशीतून समोर आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. एकजण फरार आहे.पहाटे तीन मारेकऱ्यांनी जैन यांच्या घरात घुसून दिलीप यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने घाव घातले. हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लुटून नेला; तसेच पायल ही घरात हातपाय बांधलेल्या स्थितीत सापडली होती. या प्रकरणी निजामपुरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.