प्रवाशांना ३० मिनिटांनंतर इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागणार

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोफत वायफाय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. वायफाय वापरासाठी काही जण बराच वेळ स्थानकात रेंगाळत असतात. मात्र आता प्रवाशांना वायफायसाठी शुल्क भरावे लागणार आहे. ३० मिनिटे मोफत वायफाय वापरल्यानंतर पुढील कालावधीसाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार असून ‘रेल टेल’च्या योजनेनुसार दिवसाला पाच जीबी डाटासाठी प्रवाशाला १० रुपये, तर ३० दिवसांपर्यंत ६० जीबीसाठी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि त्यांना इंटरनेटवरील माहितीही विनाअडथळा व वेगाने मिळू शके ल या उद्देशाने देशभरातील ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्याची घोषणा माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. गूगल व रेल टेल यांनी मिळून २०१५ मध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली. प्रथम पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल स्थानकात या सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचा आवाका आणखी वाढवला. फेब्रुवारी २०२० मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे गूगलने यातून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशभरातील रेल्वे स्थानकातील वायफाय सुविधा बंद होण्याची शक्यता होती. वायफाय सुविधेत गूगल कंपनीचे हार्डवेअर होते. तर ‘रेल टेल’कडून वायफाय मिळत होते. गूगलने माघार घेतली असली तरी त्यांच्या हार्डवेअरची जबाबदारी ‘रेल टेल’ने घेतली. त्यानंतर वायफाय सुरूच राहिले.

‘रेल टेल’ने ३० मिनिटांपर्यंतच मोफत वायफाय सेवा देताना त्यानंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अध्र्या तासानंतर प्रवासी मोफत वायफाय वापरू शकत नाही. त्याला सेवा हवी असल्यास ‘रेल टेल’ने दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा लागेल. दिलेल्या योजनेतील एकाची निवड केल्यास स्थानकात आल्यावर अध्र्या तासानंतर शुल्क लागू होईल, अशी माहिती ‘रेल टेल’कडून देण्यात आली. सध्या देशभरातील चार हजार स्थानकात रेल टेलची वायफाय सेवा असून यात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही योजना लागू तात्काळ लागू के ल्याचे सांगितले.

दादर स्थानकात सर्वाधिक वापर

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात येऊन वायफाय वापरणारे अधिक प्रवासी आहेत. टाळेबंदीआधी त्यांची संख्या अधिक होती. सीएसएमटी स्थानकात महिन्याला २ लाख ६१ हजार वापरकर्ते होते. त्यांच्याकडून ६१.६६ टेरा बाईट डाटा वापरला जात होता. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात २ लाख ३६ हजार ६०० प्रवाशांनी ४६.०६ टेरा बाईट डाटा वापरला होता. पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातही १ लाख ८७ हजार ४०० प्रवाशी वायफाय वापरत होते. घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, डॉकयार्ड, पनवेल, वाशी, चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, विरार स्थानकांतही त्याचा अधिक वापर करण्यात येत होता. टाळेबंदीमुळे काही महिने लोकल प्रवासावर बंधने आली व वायफाय वापरणाऱ्यांची संख्या कमीच झाली. लोकल सेवा पुन्हा पूर्ववत झाल्यास ती संख्या आणखी वाढू शकते. मुंबई उपनगरीय प्रवाशांना ३० मिनिटांनंतर वायफाय हवे असल्यास त्यासाठी पैसे मात्र मोजावे लागणार आहेत.

३० मिनिटांनंतर लागू होणारे शुल्क

५ जीबी- दिवसाला १० रुपये

१० जीबी- दिवसाला १५ रु.

१० जीबी- ५ दिवसांसाठी १५ रुपये

२० जीबी- ५ दिवसांसाठी ३० रुपये

२० जीबी- १० दिवसांसाठी ४० रुपये

३० जीबी- १० दिवसांसाठी ५० रुपये

६० जीबी- ३० दिवसांसाठी ७० रुपये