जानेवारीपासून यंत्रणा जोडणी

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या वर्षांत देशातील १०० स्थानकांमध्ये वाय-फाय सेवा देण्याच्या घोषणेचे कौतुक होत असताना आता राज्य परिवहन महामंडळाने त्यावर कडी करत नव्या वर्षांत ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या सर्वच्या सर्व १८ हजार बसगाडय़ांमध्ये वाय-फाय सेवा देण्याची घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारांमधील काही गाडय़ांमध्ये वाय-फाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता हा निर्णय झाला आहे. यासाठी नवीन करार झाला असून जानेवारी महिन्यापासून उर्वरित बसगाडय़ांमध्ये वाय-फाय यंत्रणा बसवण्याची सुरुवात होणार आहे.

सध्या एसटीच्या ताफ्यात १८,५०० बसगाडय़ांचा समावेश आहे. यात शिवनेरी, हिरकणी, परिवर्तन आणि साध्या गाडय़ा यांचा समावेश आहे. एसटीने यंदा सप्टेंबर महिन्यापासून प्रवाशांना वाय-फाय सुविधा देण्यासाठी स्वारगेट व शिवाजीनगर आगारातून सुटणाऱ्या २९५ गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय सेवा सुरू केली. प्रत्येक बसच्या प्रत्येक फेरीत २२ ते २५ प्रवाशांकडून ही सुविधा वापरली जाते. आता मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे या विभागांमधील अन्य आगारांकडे असलेल्या सर्व गाडय़ांमध्येही जानेवारीपासून वाय-फाय बसवण्यास सुरुवात होणार आहे. एसटीच्या ताफ्यातील साडेअठरा हजार बसगाडय़ांमध्ये वाय-फाय बसवण्यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च संबंधित कंपनीला येणार आहे. तर कंपनीकडून एसटी महामंडळाला प्रत्येक वर्षी १ कोटी पाच लाख रुपये मिळणार असून हा करार पाच वर्षांसाठी आहे.