29 January 2020

News Flash

भाषा समृद्धीसाठी एक परिच्छेद विकिपीडियावर!

मराठी भाषा दिनानिमित्त शासनाचा अभिनव उपक्रम

मराठी भाषा दिनानिमित्त शासनाचा अभिनव उपक्रम; ज्ञानकोश अधिक समृद्ध होणार

मराठी भाषा संवर्धनासाठी मोठय़ा प्रमाणावर  ‘ऑफलाइन’ प्रयत्न सुरू असतानाच माहिती महाजालावरही मराठी भाषा समृद्ध व्हावी या दृष्टीने येत्या मराठी भाषा दिनानिमित्त सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे अभिनव ‘ऑनलाइन’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये खुला ज्ञानकोश म्हणून ओळख असलेल्या विकिपीडियाच्या मराठी आवृत्तीत प्रत्येकाने किमान एक परिच्छेद लिहावा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येणार आहे. यामुळे हा ज्ञानकोश अधिक समृद्ध होणार आहेच, याशिवाय महाजालावरील मराठीचे सामथ्र्य वाढविण्यासही मदत होणार आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी काळानुरूप बदल होणे आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन मराठी भाषा विभागाने या वर्षीच्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संगणक व महाजालावरील मराठी समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी शाळा, महाविद्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी जरा हटके प्रयत्न करत विकिपीडिया या महजालावरील खुल्या ज्ञानकोशावर सामान्यांनी त्यांच्या गावाबद्दल, गावातील प्रसिद्ध व्यक्तीबद्दल, शाळेबद्दल, पुस्तकाबद्दल अशा विविध विषयांवर किमान एक परिच्छेद लिहावा असे आवाहन केले आहे. यामुळे हा ज्ञानकोश अधिक समृद्ध होईल व मराठी विकिपीडियाचे संकेतस्थळ केवळ इंग्रजीतील अनुवादित माहितीवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर स्थानिक व नवी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

अभियानात सहभागी व्हा!

जास्तीतजास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे या उद्देशाने २१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिनापासून मराठी भाषा विभागापर्फे जाहिराती दाखविल्या जाणार आहेत. यामध्ये राज्यातील विविध मान्यवरांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर लोकांना मराठी टंकलेखन कसे करावे त्यासाठी आवश्यक असलेली युनिकोड प्रणाली संगणकात कशी सुरू करावी या संदर्भातील माहितीपटही समाजमाध्यमांचा वापर करून सामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार असल्याचे विभागाने सांगितले. या सर्व अभियानासाठी मराठी विकिपीडियाचेही सहकार्य घेण्यात आले असून सामान्यांना नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी या उद्देशाने मराठी विकिपीडियातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या मराठी विकिपीडियावर ४५ हजार ७३९ लेख आहेत.

माहितीच्या महाजालावर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. या दृष्टीने मराठी भाषा विभागातर्फे यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी ‘संगणक व महाजालावरील मराठी’ या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी संकल्पनेवर आधारित सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वानी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद तरी लिहावा असे आवाहन करण्यात आले आहे.   – विनोद तावडे, मंत्री मराठी भाषा विभाग

मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारचा मराठी विकिपीडियाचे व्यासपीठ वापरण्याचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. यामुळे मराठी विकिपीडियावरील लेखक संख्या वाढणार असून मराठी भाषेतील हा खुला ज्ञानकोश अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.   – राहुल देशमुख, प्र-चालक, मराठी विकिपीडिया

First Published on February 12, 2017 2:05 am

Web Title: wikipedia marathi language vinod tawde
Next Stories
1 इजिप्तच्या ५०० किलोच्या महिलेची मुंबईत शस्त्रक्रिया
2 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काँग्रेसचीच
3 वायुगळतीने तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू