|| अक्षय मांडवकर

वयोवृद्ध तरसही मृत; प्राण्यांच्या अधिवासाला उतरती कळा

गेल्या वर्षभरात भायखळ्याच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’मधील (राणीबाग) ६४  प्राण्यांचा वृद्धापकाळाने वा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्याने ब्रिटिशकाळापासून मुंबईतील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून गणल्या गेलेल्या या प्राणिसंग्रहालयाची लया जाण्याच्या मार्गावर आहे. प्राणिसंग्रहालयात दोन दशकांहून अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्या दोन पट्टेरी नर तरसांपैकी सर्वात जुन्या आणि वृद्ध तरसाचा मागील रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या तरसाला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून १९९२ साली या ठिकाणी आणण्यात आले होते.

राणीबागेतील प्राण्यांच्या अधिवासाला उतरती कळा लागली आहे. वृद्धापकाळाने येथील एकेक प्राणी हळूहळू शेवटचा श्वास घेऊ लागले आहेत. हॅम्बोल्ट पेंग्विनमुळे राणीच्या बागेच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी हे परदेशी पाहुणे वगळता या बागेत पाहण्यासारखे फारसे काही राहिलेले नाही. बहुतांश प्राण्यांचे पिंजरे गेल्या काही वर्षांमध्ये रिकामे झाले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालानुसार २०१६-१७ या कालावधीत प्राणिसंग्रहालयातील ७७ प्राणी दगावले. त्यानंतरही ३८८ प्राण्यांचे संग्रहालयामध्ये वास्तव्य होते. मात्र आता या संख्येत आणखी घट झाली आहे.        २०१७-१८ या कालावधीत प्राणिसंग्रहालयातील एकूण ६४ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये ३३ पक्षी, २९ प्राणी आणि दोन सरपटणाऱ्या जीवांचा समावेश आहे. मगर, पाणघोडय़ाचे पिल्लू, हरिण, आफ्रिकन क्राऊन क्रेन पक्षी अशा महत्त्वाच्या प्राणी-पक्ष्यांचा समावेश मृत जीवांच्या यादीत आहे, तर इतर बहुतांश प्राण्यांचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्यानात गेल्या २६ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या वृद्ध नर तरसाचादेखील नुकताच मृत्यू झाला आहे.

हा पट्टेरी तरस संग्रहालयातील सर्वात जुन्या प्राण्यांपैकी आहे. पूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात मोठय़ा संख्येने तरसांचा अधिवास होता. मृत नर तरसाला १३ नोव्हेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय उद्यानातून प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले.

त्यानंतर २६ डिसेंबर १९९९ रोजी दुसऱ्या नर तरसाला उद्यानातून या ठिकाणी आणण्यात आले. तेव्हापासून तरसांची ही जोडी राणीच्या बागेत पाहायला मिळते आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून यातील वयोवृद्ध तरसाची प्रकृती ढासळल्याने त्याला संग्रहालयातील रुग्णालयात हलविण्यात आले. या वृद्ध तरसाला संधिवात झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.

मात्र अखेरीस वृद्धापकाळाने त्याने शेवटची घटका मोजली, असे प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी कोमल राऊळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हा तरस अंदाजे २९ वर्षांचा होता. इतर प्राणिसंग्रहालयाच्या अहवालानुसार बंदिस्त अधिवासात तरस २४ वर्षांपर्यंत जगतात. त्यामानाने राणीबागेत ते अधिक काळ जगले, अशी पुस्ती राऊळ यांनी या वेळी ‘लोकसत्ता मुंबई’ शी बोलताना जोडली.

मुंबईतील शेवटचे तरस

एका तरसाच्या मृत्यूमुळे राणीबागेत केवळ एकाच तरसाचे वास्तव्य उरले आहे. गेल्या २५ वर्षांपासून हा तरस या ठिकाणी पिंजराबंद आहे. तो आता वयोवृद्ध झाला आहे. या तरसालाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून या ठिकाणी आणण्यात आले होते. गेल्या १५ वर्षांत राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रातील तरसांची प्रजात नष्ट झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत तरस प्राण्याला संरक्षण आहे. मात्र मुंबईसारख्या सतत विस्तारणाऱ्या शहरामुळे येथे वनक्षेत्र असूनही ही प्रजात नामशेष झाली. या प्रजातीला वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे संवर्धन प्रकल्प राबवण्यात आले नाही. त्यामुळे राणीबागेत सध्या असलेले तरस मुंबईतील शेवटचे तरस असल्याचे बोलले जात आहे.