या शहराचे कितीही सिमेंटीकरण झाले तरी हिरवाईच्या उरलेल्या पुंजक्यांमध्ये वन्यप्राणी-पक्षी तग धरून आहेत. कधी तरी त्यांचे दर्शन होते तर कधी माणसांशी चकमक होते. हा प्राणी इथे कसा, असा प्रश्न पडतो. मात्र हे प्राणी बाहेरून आलेले नाहीत, ते इथलेच आहेत. अलीकडच्या काळात अनेकदा बातम्यांमध्ये चर्चेत राहिलेले कोल्हेही मूळचे मुंबईकरच!

मे महिना सुट्टय़ांचा आणि शहरांसाठी अनेक दृष्टींनी कंटाळवाणा. अर्धेअधिक लोक सुट्टय़ांवर गेल्याने शहराची एकूण लयच संथ झाल्यासारखी वाटते. मात्र या मे महिन्यात मुंबईत चर्चेत राहिले ते कोल्हे. विक्रोळी, घाटकोपर येथील खारफुटीच्या जंगलातून बाहेर येत माणसांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्याने हे तसे लपून छपून राहणारे प्राणी एकदम प्रकाशात आले. मुंबईत कोल्हे आहेत याचेच अनेकांना आश्चर्य वाटले. खरे तर मुंबईत कोल्हे आहेत. आपण, आपले पूर्वज आपल्या गावातून, दुसऱ्या शहरातून मुंबईत आलो, त्यापेक्षाही आधीपासून कोल्ह्यंचे पूर्वज इथे राहत होते. मानवी वस्त्यांच्या रगाडय़ात ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, इतकेच.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहतीचे क्षेत्र आणि दोन्ही किनाऱ्यांवर असलेली खारफुटी यात अनेक सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर प्राणी यांनी बस्तान बसवलेले आहे. कोल्हे हे त्यांपैकीच एक. पूर्वी मुंबईच्या जंगलात वाघही आढळत. मात्र वाघासारख्या मोठय़ा प्राण्याला दाट जंगल आवश्यक असते. विरळ होत जाणाऱ्या जंगलात हरीण किंवा मोठय़ा प्राण्यांची शिकार करणे अवघड झाल्याने हळूहळू वाघ या पट्टय़ात येईनासे झाले. बिबळ्यांनी मात्र या बदलत्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेतले. अंगापिंडाने लहान असलेले बिबळे झाडाच्या एका फांदीवरही गुपचूप बसून राहतात. हरिणाऐवजी ससा, कुत्रा यांची शिकारही त्यांना चालते. बिबळ्यांप्रमाणेच कोल्ह्यंनीही या शहरी वातावरणाशी जुळवून घेतले आहे. दुरून कुत्र्यासारखाच दिसणारा हा प्राणी पटकन लक्षातही येत नाही. विरळ झाडीतही राहू शकणाऱ्या कोल्ह्यंसाठी खारफुटीची जंगले ही तर वास्तव्याचे उत्तम ठिकाण आहेत. निवाऱ्यासाठी जागा तर मिळतेच शिवाय उंदरासारख्या लहान प्राण्यांमुळे खाण्याचीही चंगळ असते. पाण्यातून येणारे खेकडे, मासे ही तर मेजवानीच. त्यामुळे मुंबईच्या दोन्ही किनारपट्टय़ांवर, विशेषत: पूर्व किनारपट्टीवर, संवर्धित केलेल्या खारफुटीत कोल्हे राहतात. आरेमध्येही कोल्हे अनेकदा दिसतात. पूर्व उपनगरात खाडीकिनारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांनाही किंवा खाडीशेजारी इमारती असलेल्यांनाही अनेकदा कोल्ह्यंचे दर्शन होते. काही वेळा अचानक आलेल्या माणसांमुळे कुत्र्यांप्रमाणेच कोल्हाही बिथरतो. मात्र या घटना अगदीच कधी तरी घडत असल्याने चर्चेत येत नाहीत.

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मात्र कोल्ह्यने तिघांवर हल्ले केल्याने हा प्राणी चर्चेत आला. हे तीनही हल्ले घाटकोपर, भांडुप परिसरात झाले होते. हे तीनही हल्ले संध्याकाळपासून पहाटेपर्यंतच्या १० तासांत झाले. या परिसरात कोल्ह्यांची एक टोळी फिरत असल्याचे तेथील सुरक्षारक्षकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे या भागात सीसीटीव्ही लावून कोल्ह्यांना पकडण्याबाबत विचार सुरू आहे. दरम्यान तिसऱ्या आठवडय़ात मात्र दोन कोल्ह्यांना पकडण्यात आले. एक कोल्हा खड्डय़ात पडला होता तर दुसरा जखमी अवस्थेत इमारतीच्या आवारात शिरला. या दोन्ही कोल्ह्यंची तासाभरात तिथून सुटका करून वनाधिकारी घेऊन गेले. खरे तर या दोन्ही घटना तशा सामान्य होत्या. मात्र आधीच्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर स्थानिकांना कोल्ह्यंचीही भीती वाटू लागली आहे. बिबळ्या व मानव संघर्षांप्रमाणेच हा संघर्ष सुरू होण्याच्या बेतात आहे.

कोल्ह्यंनी माणसांवर हल्ले करण्याच्या किंवा मानवी वस्तीत दिसण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी विशिष्ट कारणे समोर आली होती. एक तर कोणी तरी हल्ला केल्याने जखमी झालेले, आजारी असलेले व त्यामुळे बरेच दिवस शिकार करू न शकलेले कोल्हे मानवी वस्तीत आयत्या खाद्यासाठी येतात. वस्त्यांमध्ये बाहेर टाकले जाणारे अन्न मिळत असल्याने या प्राण्याला तिथे येण्याची सवय होते. काही वेळा उकिडव्या बसलेल्या माणसाला लहान प्राणी समजण्याची चूक करत ते हल्ला करतात. काही वर्षांपूर्वी तोंड डब्यात अडकल्याने अनेक दिवस खायला न मिळालेल्या कोल्ह्यला मालाड येथील वस्तीतील काही तरुणांनी दोरीने बांधून ठेवले होते. तेव्हा करुणा परिवार संस्थेच्या  स्वयंसेवकांनी त्याला सोडवले. आरे येथेही जखमी कोल्हीण सापडली होती. गेल्या आठवडय़ात विक्रोळीच्या गोदरेज वसाहतीत सापडलेला कोल्हाही जखमी होता. हे सारे बिबळे-मानव संघर्षांशी साधम्र्य सांगणारे आहे. जखमी, आजारी किंवा वस्तीतील आयत्या खाद्याची सवय जडलेले बिबळे आरेच्या वस्तीमध्ये हल्ले करत होते. वस्तीतील कचरा कमी झाला आणि हे हल्लेही कमी झाले.

कोल्ह्यांच्या बाबतीतही याप्रकारे नियोजन करता येईल. आणि ते करण्याचीच गरज आहे. कारण हल्ले झाल्यावर कोल्ह्यंना पकडणे व उपचार करून जंगलात सोडणे हा पर्याय तितकासा तर्कशुद्ध नाही. कोल्हे हे बहुतांशरीत्या कळपात राहतात. खारफुटीतील वातावरणात सरावलेल्या कोल्ह्य़ाला जंगलातील आयुष्य कितपत पेलवेल याबाबत शंका असते. त्यामुळे कोल्हे पकडण्यापेक्षा त्यांचे हल्ले कमी कसे करता येतील, ते पाहणे अधिक योग्य ठरेल. कारण हे शहर आपल्याप्रमाणेच त्यांचेही घर आहे आणि कदाचित आपण उपरे असू, पण ते स्थानिक आहेत.

prajakta.kasale@expressindia.com