राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असल्याने, आरोग्य सुविधा देखील कमी पडत आहेत. ऑक्सिनज, व्हेंटिलेटर्स, बेड्स, रेमडिसिवीरसह आदींचा तुटवडा रूग्णालयांमध्ये जाणवत आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत माहिती दिली.

अनिल परब म्हणाले, ”राज्यात ऑक्सिजनची ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी ते पोहचतं करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला जाणार आहे. जेणेकरून कुठल्याही अडथळ्याशिवाय ऑक्सिजनचे टँकर इच्छितस्थळी लवकर पोहचतील. कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन टँकर वाहतुकीत अडथळा येणार नाही.”

तसेच, ”ज्या गोष्टी केंद्र सरकारच्या हाती आहेत, त्याची मागणी केंद्र सरकारकडेच केली जाणार. दुसरीकडे कोणाला मागणार? जर, ऑक्सिजन व रेमडेसिवीर वितरणाचे अधिकार राज्य सरकारला दिले तर, राज्य सरकार केंद्राकडे कशाला परवानगी मागेल. स्वतः उत्पादन करून ते वितरीत करेल. असं देखील यावेळी परब यांनी बोलून दाखवलं.

”राज्य सरकारचं हे धोरण आहे की, रेमडेसिवीरचा काळाबाजार जर कोणी करत असेल तर त्याला सोडणार नाही. यासाठी विविध ठिकाणी छापेमारी देखील सुरू आहे. औषधांचा साठा सापडल्यास पोलीस व एफडीएकडून कारवाई केली जात आहे.” अशी देखील अनिल परब यांनी माहिती दिली.

”कोविड परिस्थितीत परिवहन खातं अतिशय तत्परतेने काम करत आहे. दोन- तीन विषय सध्या आम्ही हाताळतो आहोत, आज काही चालक लॉकडाउनमुळे आपल्या मूळगावी परतले आहेत, यामुळे निर्माण झालेली कमी भरून काढण्यासाठी परिवहन खातं काम करत आहोत,” असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.