News Flash

नाल्यातून काढलेला गाळ खाडीकिनारी टाकणार?

मुंबईमधील क्षेपणभूमीमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढण्यात येणारा गाळ टाकण्यासाठी कंत्राटदारांनी ठाणे, तसेच ठाणे, घोडबंदर, मालाड, मिरा-भाईंदर खाडीलगतच्या सखलभागाची आणि पनवेल परिसरातील खाजणभूमीची निवड

| April 21, 2013 03:06 am

मुंबईमधील क्षेपणभूमीमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून काढण्यात येणारा गाळ टाकण्यासाठी कंत्राटदारांनी ठाणे, तसेच ठाणे, घोडबंदर, मालाड, मिरा-भाईंदर खाडीलगतच्या सखलभागाची आणि पनवेल परिसरातील खाजणभूमीची निवड केली असून कंत्राटदार संबंधित यंत्रणांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र गेल्या बुधवारी नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने कंत्राटदारांना अजूनही कार्यादेश न दिल्याने हा वेळकाढूपणा पावसाळ्यात मुंबईकरांसाठी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाल्यातून काढलेला गाळ मुंबईमधील क्षेपणभूमीत जागा नसल्यामुळे तो टाकायचा कुठे असा प्रश्न महापालिकेला पडला होता. त्यामुळे ही जबाबदारी कंत्राटदारांवरच टाकण्यात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला  निविदा भरलीच नाही. मुंबईच्या आसपास गाळ टाकण्यासाठी जागा मिळेल का याची खातरजमा केल्यानंतर कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यामुळे निविदा प्रक्रियेस विलंब झाला. दरवर्षी १ एप्रिलपासून नालेसफाईची कामे सुरू होतात. परंतु यंदा पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नालेसफाईच्या कामाच्या १२३ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी मिळण्यासाठी १७ एप्रिलचा दिवस उजाडला. प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कंत्राटदारांना कार्यादेश देणे आवश्यक होते. परंतु ते आजतागायत त्यांच्या हाती पडलेले नाहीत. कार्यादेश मिळाल्यानंतर सात दिवसांत नाल्यातील गाळ कुठे टाकणार याची माहिती संबंधित यंत्रणेच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासह कंत्राटदारांना प्रशासनास कळवावी लागेल. काही कंत्राटदार अद्यापही गाळ टाकण्यासाठी जागा शोधत आहेत. या सात दिवसांत गाळ कुठे टाकणार हे सांगता आले नाही तर त्यांच्या हातून काम निसटेल आणि त्यांच्यावर दंडाची आफत ओढवेल. हे टाळण्यासाठी प्रशासनातील काही अधिकारी कार्यादेश देण्यास विलंब करीत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. मात्र मालेसफाईची कामे मिळविलेल्या काही कंत्राटदारांनी गाळ टाकण्यासाठी ठाणे, घोडबंदर, मिरा-भाईंदर, मालाड येथील खाडीलगतच्या सखल भागांमध्ये तसेच पनवेलच्या आसपास असलेली खाजणभूमी आधीच हेरून ठेवली आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात ते आहेत. या यंत्रणांनी हिरवा कंदिल दिला, की तात्काळ कार्यादेश स्वीकारून नालेसफाईच्या कामाला ते लागणार असल्याचे समजते.
यंदा नालेसफाईची कामे सुरळीत होतील
नाल्यातून काढलेला गाळ सुकण्यासाठी एक-दोन दिवस काठावरच ठेवावा लागतो. त्यामुळे गाळ टाकण्यासाठी निवडलेल्या जागेविषयी कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता कंत्राटदारांच्या हाती काही दिवस आहेत. परिणामी यंदा नालेसफाईची कामे सुरळीतपणे पार पडतील, असे एका पालिका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 3:06 am

Web Title: will detritus of the brook put on crick side
Next Stories
1 बॉलीवूडकडून बलात्काराचा निषेध
2 खिशाला आणखी सहा हजारांची चाट
3 प्राध्यापकांचा संप सुरूच राहणार
Just Now!
X