मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची ही वेळ नाही, असे स्पष्ट करीत महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचा समारोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपले मत मांडले.
उद्धव ठाकरे यांनीच विधानसभा निवडणुकीचे नेतृत्त्व करावे, असे पक्षाच्या विविध पदाधिकाऱयांनी या मेळाव्यात सांगितले. त्याचबरोबर ‘सामना’मध्येही पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वचन देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात येईल, अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शिवसैनिकांच्या भावनेचा मी आदर करतो. पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची ही वेळ नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आपण अद्याप ठरविलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.