News Flash

मुंबई समूह संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचली का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबईत ६२९७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु

करोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील परिस्थितीही अजून पूर्वपदावर आलेली नाही. मुंबईत दररोज १ हजारच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १ लाख १३ हजारांवर गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत समूह संक्रमण झाल्याचंही बोललं जात आहे. मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयसीएमआरशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील समूह संक्रमणाविषयी भाष्य केलं. “मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालाबद्दल आयसीएमआरशी चर्चा करणार आहे. मुंबई शहर संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे का? याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल. समूह संक्रमण आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर या दोन संस्थाच महाराष्ट्र आणि देशातील समूह संक्रमणाविषयी सांगू शकतात. त्यांच्याकडे तज्ज्ञ आहेत,” असं टोपे म्हणाले.

“झोपडपट्टी भागात संक्रमण जास्त झाल्याचं दिसून आलं आहे. पण, ते सार्वजनिक शौचालयामुळे झालं असावं. चांगल्या वसाहतींमध्ये हे संक्रमणाचं प्रमाण १५ ते १६ टक्के इतकंच आहे. अद्याप आम्ही हे म्हणू शकत नाही की, संपूर्ण शहरात किंवा राज्यात समूह संक्रमण झालेलं आहे,” असं टोपे यांनी सांगितलं.

मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून बुधवारी दिवसभरात १०,७३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत ५ लाख १६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी १२२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण बाधितांचा आकडा १ लाख १३ हजारांवर गेला आहे. तर ५३ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६२९७ रुग्णांचा करोनाने बळी गेला आहे. मुंबईत सध्या २०,२११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 8:41 am

Web Title: will discuss with icmr about community transmission says rajesh tope bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीत व्यवसायालाच टाळे!
2 वातानुकूलित लोकलचे भवितव्य अधांतरी
3 Coronavirus : नानाचौक, मलबार हिलमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ
Just Now!
X