ज्या शिवसेनेने राजकारणात आणून मोठे केले. अगदी मुख्यमंत्रीपदावर बसविले त्यांच्यावरच पलटणारे नारायण राणे हेच कृतघ्न असून हिम्मत असेल तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान राणे यांचे कट्टर विरोधक दीपक केसरकर यांनी रविवारी दिले. एवढेच नव्हे तर आपल्यावरील आरोप थांबले नाहीत तर राणेंचे सर्व ‘उद्योग’ बाहेर काढू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
केसरकर यांना आपणच राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून दिले. मात्र आता ते कृतघ्न झाल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्यांच्या आरोपांचा समाचार घेणाऱ्या केसकर यांच्या विधानांमुळे कोकणात हा वाद आणखी पेटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. राणेंच्या स्वागताला कोकणात सध्या केवळ १०० ते २०० लोक जमत आहेत. त्यांच्या दहशतीला कंटाळूनच लोकांनी त्यांच्या मुलास पराभूत केले. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. कोकणातून राणेंची कारकीर्द संपली असून हिंमत असेत तर आता त्यांनीही विधानसभेत लढावे. राणे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत असे आव्हान केसकर यांनी यावेळी दिले.
राणेंविरोधात पाच कोटींचा दावा
राणे यांनी आपल्यावर जे आरोप करून बदनामी चालविली आहे, त्याबद्दल पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राणे यांच्याकडून आपल्या जीवास धोका असून याची कल्पना विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे. यापुढे राणे यांनी बेताल वक्तव्ये थांबविली नाहीत तर त्यांचे उद्योग लोकांसमोर आणू , असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काही वर्षांपूर्वी चेंबूरमध्ये कार्यरत हऱ्या-नाऱ्या टोळीतील नाऱ्या कोण याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. त्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जुन्या फाईल्स काढून नाऱ्या कोण यांची माहिती जनतेला द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.