परिवहन खात्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवीन वाहतूक प्रणाली आणणार असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्या विधानसभेतील भाषणांचे मुद्देसूद या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्या वेळी गडकरी यांनी वाहतूक व्यवस्था तसेच जलवाहतूक प्रकल्पाची माहिती दिली.
मुंबईत वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ झालेला आहे. परिवहन विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यासाठी नवीन कायदे आणून नवीन वाहतूक प्रणाली राबवून हा भ्रष्टाचार दूर करणार असे ते म्हणाले. दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही असलेली यंत्रप्रणाली कार्यान्वित केली जाईल आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या घरात २४ तासाच्या दंडाची पावती पाठवली जाईल, असे ते म्हणाले. तीनदा सिग्नल तोडणाऱ्यांचा वाहतूक परवाना रद्द केला जाईल तसेच तिप्पट दंडही आकारला जाणार आहे. मुंबईत लवकरच ब्रिक बॅंकेचे कार्यालय सुरू करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. समुद्रावर पूल बांधण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समुद्राखालून बोगदे तयार करण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी १५ हजार रुपये मुंबईसाठी आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.