News Flash

Rain in Mumbai : मंबईत मान्सूनच्या सरी बरसणार! कुलाबा वेधशाळेनं दिली आनंदाची बातमी!

मुंबईमध्ये मंगळवार ८ जून किंवा बुधवार ९ जून रोजी मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून लवकरच मुंबईत होणार दाखल (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या चार महिन्यांपासून मुंबईकरांना उन्हाळ्याचा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागलत आहे. मात्र, आता मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार आहे. कारण आज (मंगळवार) किंवा उद्या ९ जून रोजी मुंबईत मान्सूनचं आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच म्हणजे ५ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, मुंबईकरांना अजूनही मान्सूनची प्रतिक्षा असून आज किंवा उद्या मुंबईकरांना मान्सूनचं स्वागत करता येणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासाठी अनुकूल असं वातावरण आता निर्माण झाल्याचं देखील कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे.

 

“मुंबईत मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून आज किंवा उद्या मुंबईत मान्सूनचं आगमन होईल”, अशी माहिती मुंबई वेधशाळेच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे.

 

दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, नैऋत्य मोसमीव वारे लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या उरलेल्या भागात, तेलंगणामध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये मार्गक्रमण करतील. त्याशिवाय ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालमध्ये देखील काही भागांमध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

समजून घ्या : मान्सून नेमका ओळखायचा कसा? मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसामधील फरक काय?

अतिवृष्टीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता!

मुंबईतील पावसाच्या आगमनासोबतच मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातल्या सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या चार दिवसाच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करण्याचे आणि समन्वय राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:44 pm

Web Title: will it rain today in mumbai colaba imd mumbai forecast monsoon arrive pmw 88
Next Stories
1 “…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट!
2 आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर
3 “आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं”, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया!
Just Now!
X