News Flash

नियमभंग खपवून घेणार नाही!

 दुसऱ्या लाटेचा सामना करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 

मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी, आयुक्तांना सक्त ताकीद

मुंबई :  राज्यात अजूनही करोनाचे आव्हान संपलेले नाही.  कोणत्याही स्तरामध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारंभात गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट ताकीद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिली.

लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करताना जे निकष आणि पाच स्तर ठरविले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यावा. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करण्याच्या  सरकारच्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाल्याचा समज निर्माण झाला होता. त्यावर दूरचित्रसंवादाच्या माध्यातून झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असे आदेश दिले. गेल्या वर्षी सण, उत्सवानंतर संसर्ग वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट  सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरे म्हणजे उत्परीवर्तन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

दुसऱ्या लाटेचा सामना करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठय़ावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पावले उचलतो अगदी त्याचप्रमाणे करोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, करोना रुग्णाच्या संख्येत चढ-उतार होत असतात. आपण स्तर ठरविले असले तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला, कुठल्याही दबावाला बळी पडू नका. कोणत्याही परिस्थितीत करोनाला आमंत्रण  देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे.  दैनंदिन व्यवहार किती सुरू करायचे, किती काळ सुरु ठेवायचे या निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना असेल अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

करोनामुक्त गावांची टक्केवारीही गृहीत धरणार..

नागरिकांनी करोनाच्या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे. यासाठी आपापल्या जिल्ह्यात पुरेशी जनजागृती करा. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण करोनामुक्त गाव करा असे आवाहन केले आहे. या करोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 2:56 am

Web Title: will not tolerate covid violation rules says chief minister uddhav thackeray zws 70
Next Stories
1 मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० बाधितांचा मृत्यू
2 बेस्ट आजपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने
3 मुंबईतून तीन मार्गावर बुलेट ट्रेन
Just Now!
X