केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. आमच्या काळात हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगतानाच रस्त्यांची परिस्थिती वाईट असेल तर कंत्राटदारांवर मी बुलडोजर चालवेल असं गडकरी म्हणाले.

प्रसिद्ध लेखक तुहिन सिन्हा यांच्या ‘इंडिया इन्सपायर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशान सोहळ्याच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये घेतलेल्या पुढाकारासंदर्भात हे पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशाचा कार्यक्रम काल मुबंईत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी वाहतूक मंत्रालयाच्या कामाची माहिती दिली. आम्ही आतापर्यंत कमीत कमी १० लाख कोटींच्या कामांच्या निविदा दिल्या आहेत आणि हे सांगताना मला गर्व वाटतो की, आतापर्यंत कामाची ऑर्डर घेण्यासाठी एकाही कंत्राटदाराला दिल्लीतील कार्यालयात येण्याची गरज पडली नाही. ही गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. तसेच प्रत्येक कंत्राटदाराला खडसावून सांगण्यात आलं आहे की, जर रस्त्याची कामं नीट झाली नाही. तर तोच बुलडोजर तुमच्यावर फिरवला जाईल आणि हे असं बोलण्यात मला काहीच संकोच वाटत नसल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. रस्ते ही राष्ट्रीय संप्पती आहे आणि त्यामुळेच त्यांच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करता कामा नये अशी आपली भूमिका असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.

नवी मुंबई विमानतळावर जलमार्गाने पोहचता येणार

नवी मुंबई विमानतळाला जलमार्गाने जोडण्याची योजना असल्याचेही गडकरींनी यावेळी बोलताना सांगितले. भविष्यात नवी मुंबई येथे साकारले जाणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रस्त्यांबरोबरच जलमार्गानेही जोडण्याची योजना आहे. जलमार्गाने अवघ्या २० मिनिटांमध्ये विमानतळावर पोहचता येईल. मात्र या योजनेबद्दल काही पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप नोंदवत याविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती गडकरींनी दिली. मात्र याआधी आपण मुंबईमध्ये असताना मंत्री होतो तेव्हा अशाच प्रकारे अनेक प्रकल्पांना विरोध करण्यात आला होता अशी आठवणही गडकरी यांनी करुन दिली. मुंबईत मंत्री असताना अनेक प्रकल्पांविरोधात कोर्टात १०० हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच मी कोणत्याही परिस्थित पर्यावरणाशी तडजोड करणार नाही असंही गडकरी म्हणाले. नवी मुंबई विमानतळ जलमार्गाने जोडण्याच्या प्रकल्पातून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी आमच्याकडून सर्वोत्तम उपाययोजना करण्यात येणार आहेत. तरीही याबद्दल याचिका दाखल झाल्यामुळे कामाला उशीर होत असल्याची माहिती गडकरींनी दिली.