निशांत सरवणकर

म्हाडा सोडत विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच करोना विलगीकरण केंद्रासाठी पालिकेने संबंधित घरे ताब्यात घेतल्याने सुमारे दोन हजार विजेते हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. या घरांपैकी फक्त ३७६ घरे म्हाडाला परत करण्यात आली असून, उर्वरित घरे तात्काळ परत मिळावीत, यासाठी म्हाडाने पालिकेकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने मानवतेच्या दृष्टिकोनातून सोडतीत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांची घरे विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिली. करोनाची साथ लवकर आटोक्यात येईल, असे म्हाडाला वाटले होते. आता राज्य शासन तसेच पालिकेने करोनाबाधितांसाठी मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी काही केंद्रे पालिका बंद करीत आहे. अशा वेळी पालिकेने म्हाडा विजेत्यांची घरे परत करावीत, अशी मागणी मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

यापैकी काही सोडत विजेत्यांच्या खात्यातून कर्जाचे हप्ते वजा करण्यास बँकेने सुरुवात केली आहे. ताबा मिळालेला नसतानाही या विजेत्यांना घरांच्या हप्त्यांचा बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने ही घरे पुन्हा तात्काळ ताब्यात द्यावीत. म्हणजे विजेत्यांना घरांचे वितरण करणे सुलभ होईल, असे म्हसे यांनी स्पष्ट केले.

महावीरनगर कांदिवली येथील १६०, तर चारकोप येथील २१६ घरे ऑगस्टमध्ये म्हाडाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या घरांचा विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरू केली आहे. उन्नत नगर, गोरेगाव येथील विजेत्यांची घरे अद्याप विलगीकरणासाठी वापरली जात आहेत. मात्र या घरांच्या विजेत्यांना बँकांनी हप्ते भरण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. घराचे संपूर्ण पैसे भरूनही ताबा न मिळाल्याने हे विजेते हैराण झाले आहेत. प्रतीक्षानगर सायन – ८४, अँटॉप हिल, वडाळा – २७८, मानखूर्द – २५०, शेल टॉवर, चेंबूर – १७१ ही घरे पालिकेने अद्याप ताब्यात दिलेली नाही.

पालिकेला पत्र..

लोअर परळच्या श्रीनिवास मिल येथे गिरणी कामगार तसेच संक्रमण घरे अशी ७२८ आहेत. गिरणी कामगारांसाठी सोडत काढण्यात आली आहे. परंतु त्यांनाही ताबा देता आलेला नाही. यातील संक्रमण घरांचेही वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यांचा ताबाही रखडला आहे. वडाळा येथील बॉम्बे डाइंगमध्ये १६३२ इतकी संक्रमण घरे उभारण्यात आली. तीही विलगीकरणासाठी पालिकेने ताब्यात ठेवली आहेत. पालिकेकडेही बऱ्यापैकी खाटांची व्यवस्था झाल्यामुळे ही घरे ताब्यात द्यावीत, अशी विनंती म्हाडाने पत्राद्वारे केली आहे.