जवळपास दोन महिने ‘ऑक्टोबर हिट’ने घामाघूम झालेल्या मुंबईत अखेर थंडीने प्रवेश केला आहे.

गेले काही दिवस शहरावर असलेला बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन त्याची जागा आता वायव्येकडून येणारे कोरडे वारे घेत आहेत. याचे ठळक परिणाम मुंबईच्या तापमानावर जाणवू लागले आहेत. शनिवारी मुंबईतील सांताक्रुझ भागात १८ अंश सेल्सियस तर कुलाबा येथे २३ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असून येत्या दोन दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच मुंबईत थंडीचे आगमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या दशकातील सर्वात कमी तापमान हे ११.४ अंश सेल्सियस असून त्याची नोंद २७ डिसेंबर २०११ रोजी झाली होती. तर आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची विक्रमी नोंद ही १०.६ अंश सेल्सियस असून ते २० डिसेंबर १९४९ रोजी नोंदवले गेले होते. दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईत सुरू होणारा गारवा यंदा मात्र ईशान्य मान्सून व कमी दाब क्षेत्रामुळे वाऱ्यांची दिशा सतत बदलत राहिल्यामुळे लांबला होता.