News Flash

राज्यात बोचरी थंडी

तापमान आणखी घटण्याची शक्यता

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तापमान आणखी घटण्याची शक्यता

कोरडय़ा वाऱ्यांमुळे नोव्हेंबरमध्ये जाणवू लागलेला गारवा आणि ओखी वादळामुळे कोकण किनारपट्टीवर दोन दिवस पडलेली थंडी यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी थंडीला सुरुवात झाली आहे. बुधवारी जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी १०.२ अंश से. तापमान नोंदले गेले, तर मुंबईत सांताक्रूझ येथे पारा १७.३ अंश से. पर्यंत घसरला. मुंबईतील हे या ऋतूमधील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.

अफगाणिस्तानच्या दिशेकडून येत असलेल्या पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील अनेक राज्ये गारठली आहेत. राजस्थान व गुजरातमधील अनेक जिल्ह्य़ांतील तापमानात घट झाली आहे. त्याचेच परिणाम राज्यातील पश्चिम भागात दिसू लागले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणातील किमान तापमान २ ते ३ अंश से. ने घसरले आहे. मराठवाडा व विदर्भातील तापमानात फारशी घट झालेली नसली तरी बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते १२ अंश से. दरम्यान राहिले.

मुंबईत बुधवारी नोंदवलेले किमान तापमान हे या मोसमातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान असून ओखी वादळामुळे ८ डिसेंबर रोजी किमान तापमान १८.६ अंश से. पर्यंत खाली उतरले होते. मंगळवारी किमान तापमान १८.५ अंश से. होते. बुधवारी त्यात आणखी एका अंश से. ने घट झाली. गेल्या दहा वर्षांत मुंबईत डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात किमान तापमान अनेकदा १२ अंश से. पर्यंत खाली गेले आहे. २४ डिसेंबर २०१५ रोजी ११.४ अंश से. या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती.

उत्तर भारतात पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश या राज्यात थंडीची लाट असून शुक्रवारपासून राजस्थान आणि गुजरातमध्येही थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:58 am

Web Title: winter in mumbai 2
Next Stories
1 ‘शाळाबाह्य़’ मुलांच्या शोधात शिक्षक!
2 उन्नत प्रकल्प अखेर बासनात
3 शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार!
Just Now!
X