मुस्लिम आरक्षणावरुन विधानसभेतील सर्व मुस्लिम आमदार आक्रमक झाल्याचे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले. आरक्षणाची मागणी करत आमदार अबू आझमी, अस्लम शेख, अब्दुल सत्तार आणि नसीम खान यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदं ही भिरकावली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन गदारोळ झाल्याने आज (सोमवार) दिवसभरात चौथ्यांदा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सरकारला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे नसल्याचा आरोप या आमदारांनी केला. आरक्षणाच्या मागणीवरुन हे आमदार आक्रमक झाले होते. या आमदारांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला. अखेर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

तत्पूर्वी, अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे काय झाले, असा सवाल करत प्रत्येकजण स्वत:च्या फायद्यासाठी राजकीय भाकरी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षण देताना घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीत ते आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे.