मुंबईत पारा १७ अंशांच्या खाली; दुपारच्या तापमानातही लक्षणीय घट
सकाळच्या गुलाबी थंडीने आणि दुपारच्या अंगाला चटके न देणाऱ्या उन्हामुळे मुंबईकर सुखावले आहेत. शहरासह राज्यात थंडीने बस्तान पक्के केले असून आतापर्यंतची तापमानाची नोंद पाहता थंडीचा कडाका येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या साठ वर्षांतील डिसेंबर महिन्यातील तापमानाच्या आकडेवारीमधून डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तापमान ११ ते १२ अंश से.पर्यंत खाली घसरलेले दिसते.
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील थंडी वाढली आहे. सकाळी तापमापकातील पारा १७ अंश से. पर्यंत खाली येत आहे. त्यातच दुपारच्या तापमानातही घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोरडी हवा व कमाल तापमानात नोव्हेंबरच्या तुलनेत झालेली चार ते पाच अंशांची घसरण यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. रविवारी सकाळी किमान तापमान १७.२ अंश से. तर कमाल तापमान २९.५ अंश से. होते. या गुलाबी थंडीचे येत्या काही दिवसांत बोचऱ्या थंडीत रूपांतर होण्याचा अंदाज आहे. वेधशाळेच्या अधिकाऱ्यांच्या या मताला गेल्या साठ वर्र्षांमधील तापमानाच्या नोंदीही पुष्टी देत आहेत.
गेल्या दहा वर्षांतील डिसेंबरमधील किमान तापमानाचा विक्रम हा महिन्याच्या उत्तरार्धात नोंदला गेला आहे. त्यातही पाच वर्षांमध्ये महिन्याच्या अखेरच्या पाच दिवसांत तापमापकातील पारा सर्वात खालच्या पातळीवर घसरला होता.

या वर्षी थंडीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यातच सध्या वारे ईशान्येकडून असून ते फारसे प्रभावी नाहीत. वारे थेट उत्तरेकडून येण्यास सुरुवात झाली की थंडीचा कडाका वाढू शकेल.
-वेधशाळेतील अधिकारी