मुंबईमधील रस्त्यांवरून पावसाळ्यामध्ये प्रवास करताना प्रत्येक मुंबईकर कधी ना कधी अरे किती खड्डे आहेत या रस्त्यांवर असा प्रश्न उपस्थित करतो. मात्र प्रत्येक मुंबईकराला दर पावसाळ्यात पडणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर काही मुंबईकरांनीच शोधले आहे. तर मुंबईतील रस्त्यावर खड्डे कीती या प्रश्नाचे उत्तर आहे ‘किमान’ २७ हजार ३६३. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी यंत्रणेने नाहीतर मुंबईकरांनी खड्डे मोजण्याचे हे काम ‘करुन दाखवलं’ आहे.

आरपीआयचे नेते असणाऱ्या नवीन लाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या एका आगळ्यावेगळ्या मोहिमेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या मुंबईकरांनी रस्त्यांवरील २७ हजार ३६३ खड्डे मोजले आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे खरोखरच अस्तित्वात आहेत याची चाचपणीही संबंधित ठिकाणी जाऊन करण्याचे काम या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी मागील एका महिन्यात केले आहे. त्यामुळे हा आकडा टेस्टेड आणि व्हेरिफाइड असल्याचे खड्डे मोजणाऱ्या मुंबईकरांचे म्हणणे आहे.

सर्वाधिक खड्डे असणारे शहर म्हणून मुंबई शहराचे नाव रेकॉर्ड बुक्समध्ये जावे यासाठी शहरामधील रस्त्यांवर २० हजार खड्डे मोजण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन महिनाभरापूर्वी लाडे यांनी सोशल नेटवर्किंगवर मोहिम सुरु केली. मुंबईमधील खड्ड्यांची माहिती द्या असं आवाहन सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केलं होतं. या आवहानाला उत्तर म्हणून मुंबईकरांनी चक्क २७ हजारहून अधिक खड्ड्यांची माहिती लाडे यांच्याकडे पोहचवली आहे. आलेली ही माहिती तपासून पाहण्यासाठी लाडे यांनी रायझिंग स्टार नावाची एक टीम तयार केली. या टीमने महिनाभरात ज्या ज्या भागातील नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो पाठवले आहेत तिथे जाऊन खरच त्या जागी ते खड्डे आहेत का याची पाहणी केली आणि आपला एक डेटाबेस तयार केला. याच पहाणीअंतर्गत हा २७ हजार ३६३ खड्ड्यांचा आकडा समोर आला आहे.

जगभरातील विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वाधिक खड्ड्यांचे शहर अशा कॅटेगरीमधील एकाही शहराची नोंद नाहीय. म्हणूनच लाडे यांनी अशा पद्धतीचा विक्रम मुंबईच्या नावे व्हावा यासाठी तिन्ही जागी अर्ज केला होता. मात्र खड्ड्यांसरखा विषय हा राजकीय असून खड्ड्यांची मोजणी करणे शक्य नसल्याचे सांगत गिनीज बुकने हा अर्ज फेटाळला तर इतर दोन्ही रेकॉर्ड बुक्सने हा अर्ज स्वीकारला असून दिलेली माहिती तपासून पाहून त्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन लाडे यांना दिले आहे.

मुंबईमध्ये दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना आपले प्राण गमावतात. दरवर्षी ही समस्य उद्भवते आणि त्यावर सरकारी यंत्रणा कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे दर पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. म्हणूनच आता रेकॉर्ड बुकमध्ये गेल्यावर तरी प्रशासनाला जागं येईल अशी आशा बाळगून हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लाडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. खड्ड्यांची माहिती मिळवण्यासाठी लाडे यांनी ‘मुंबई पॉटहोल्स डॉटकॉम’ नावाची वेबसाइटही त्यांनी सुरू केली आहे. तर लाडेंच्या टीमने मुंबईमध्ये महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या ४०० खड्ड्यांचे जीओ टॅगिंगही केले आहे. हे जीओ टॅगिंग करणारे राजेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेकांनी खड्ड्यांचे फोटो पाठवले होते. त्यामुळेच एकाच ठिकाणावरील खड्ड्यांचे फोटो पुन्हा पुन्हा येऊन त्यांची दोनदा मोजणी होण्याची शक्यता होती. आणि झालेही तसेच जेव्हा सर्व माहिती समोर आली त्यावेळी १५ टक्के खड्डे दोनदा मोजले गेल्याचे आमच्या लक्षात आले. म्हणून आम्ही दोनदा मोजणी झालेले हे खड्डे डेटाबेसमधून काढले. आणि जीओ टॅगिंगच्या मदतीने रस्त्यांना टॅग केले असून यामुळे एकच खड्डा दोनदा मोजला गेले नसल्याचे सोनी सांगतात. अजूनही मुंबईकर mumbaipotholes.com या साईटवर जाऊन त्यांच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती अपडेट करु शकतात अशीही माहिती सोनी यांनी दिली.

आमच्या टीमला हे २७ हजारहून अधिक खड्डे प्रत्यक्षात मोजण्यासाठी ३८ दिवसांचा कालावधी लागल्याची माहिती लाडे यांनी दिली. या आकड्यावरून मुंबईमधील रस्त्यांच्या वाईट स्थितीची कल्पना येते असेही लाडे म्हणाले. यासाठी आम्ही चार लाख रुपये खर्च केल्याची माहिती लाडे यांनी दिली.

टीमने केलेली कामे

मुंबईकरांनी पाठवलेल्या खड्ड्यांचे फोटोंचे ठिकाण प्रत्यक्षात जाऊन बघून येणे, या मोहिमेसंदर्भात जनजागृती करणे, सोशल मिडियाच्या माध्यमातून ही मोहिम अधिक अधिक मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. हे लोक मोटरसायकल वरून मुंबईतील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरून तेथील खड्ड्यांची चाचपणी कऱण्याबरोबरच ज्यांना या मोहिमेबद्दल माहिती नाही त्यांना यासंदर्भातील सर्व माहिती देतात.