शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाला महापौर बंगला येथे गणेशपुजनाने बुधवारी सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते यावेळी गणेशपुजन झाले. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा नेत्या पुनम महाजन, मुंबईचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि ठाकरे कुटुंबिय उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी महापौर बंगल्याच्या हस्तांतरणाची अधिकृत कादगपत्रे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आता अधिकृतरित्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

आज (दि.२३) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९३वी जयंती आहे. यानिमित्तानेच त्यांच्या स्मारकाचे भुमिपुजन पार पडले आहे. तत्पूर्वी मंगळवारीच राज्य मंत्रीमंडळाने या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधीला मंजूरी दिली. शिवाजी पार्कजवळ असलेल्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे. ११,५०० चौरस मीटर एवढ्या मोक्याच्या जागी हे स्मारक होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी स्मारकासाठी महापौर बंगल्याची ही जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.