कुख्यात गुंड राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन ऊर्फ नाना याचा ताबा भारतीय तपास यंत्रणांना आठवडय़ाभरात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाचे विशेष पथक सध्या इंडोनेशियात ठाण मांडून असल्यामुळे त्याचा ताबा पुढील आठवडय़ात मिळेल, असा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाने केला आहे. मात्र छोटा राजनचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल, असा दावा मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून इंडोनेशियातील बाली या बेटावर छोटा राजन अधूनमधून जात असे. मोहन कुमार या टोपणनावाने असलेल्या पासपोर्टच्या जोरावरच त्याचा हा प्रवास सुरू असे. छोटा राजनच्या विरुद्ध १९९५ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली . या काळात तो मलेशिया, बँकॉक आणि नंतर बराच काळ तो ऑस्ट्रेलियात वावरत होता. ऑस्ट्रेलियातून वेळोवेळी इंडोनेशियातही तो जात असे. याबाबतची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेकडे होतीच. मात्र आताच २० वर्षांनंतर रेड कॉर्नर नोटीसवरून तो पकडला गेला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या आशीर्वादानेच तो पकडला गेला असावा, असा दावाही केला जात आहे. त्याचा ताबा मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही सांगितले जात आहे. मात्र गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याचा ताबा मिळण्यासाठी कालावधी किती लागेल, हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रियाझ भटकळला मारल्याचा दावाही राजनच्या अंगलट..

दीप्तिमान तिवारी, एक्स्प्रेस वृत्तसेवा : भारताला हवा असलेला दहशतवादी कराचीस्थित इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज शाहबंदरी ऊर्फ रियाज भटकळ याला २०११ मध्ये ठार केल्याचा दावा इंडोनेशियात पकडण्यात आलेला कुख्यात गुंड छोटा राजन याने गुप्तचर यंत्रणेकडे केला असल्याचे कळते. छोटा राजन हा त्या वेळी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता.
आपला दावा सिद्ध करण्यासाठी छोटा राजन याने भटकळच्या शरीरावर गोळ्या लागल्याचे छायाचित्र सादर केले होते. मात्र त्याची खातरजमा केली असता ती बाब असत्य असल्याचे उघडकीस झाले. राजनला त्याच्याच एका मारेकरी साथीदाराने भटकळ याचे छायाचित्र फोटोशॉपवर बनवून दिले आणि भटकळला मारल्याचा दावा केला होता.
भटकळ याने जयपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, वाराणसी आणि दिल्लीत स्फोट घडविले होते आणि पाच वर्षांपासून तो गुंगारा देत होता. त्यामुळे राजनच्या पाठिंब्याने हे मोठे यश मिळाल्याचे मानले जात होते. मात्र या दाव्याची खातरजमा केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. महाजालावर भटकळचे छायाचित्र होते त्या प्रतिमेवर बॅण्डेज गुंडाळण्यात आले आणि भटकळ याला ओळखता यावे यासाठी त्याचा चेहरा उघडा ठेवण्यात आला होता. दरम्यान, भटकळ जिवंत असल्याचे पाकिस्तानातील सूत्रांकडून कळले होते. भटकळ जिवंत असल्याचे राजनला सांगण्यात आले तेव्हा त्याला आपल्याला फसविण्यात आल्याचे कळले. राजनने छायाचित्र देणाऱ्या व्यक्तीला लाखो रुपये दिले होते. राजन हा दुबळा झाला होता आणि तो भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी उत्सुक होता या दोन गोष्टी यावरून स्पष्ट होत होत्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्यार्पणात अडथळा नाही
‘मिड-डे’चे ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येत छोटा राजनचा सहभाग आढळल्यामुळे खळबळ माजली होती. आतापर्यंत संघटित गुन्हेगारी टोळीतील कुठल्याही म्होरक्याने थेट पत्रकाराची हत्या केली नव्हती. छोटा राजनबाबत गुप्तचर यंत्रणांमध्ये असलेल्या नाराजीचे हेही एक कारण सांगितले जात आहे. रेड कॉर्नर नोटिशीमुळे तो पकडला गेल्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणात अडथळा येणार नाही, असेही केंद्रीय सूत्रांचे म्हणणे आहे.