मुंबई : राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी बांधिल असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केले.

काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, असे विधान पवार यांनी केले होते. पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यघटनेतील मूल्यांना आणि ती जपणाऱ्यांना सध्या वाईट दिवस आले आहेत. समाजात-देशात भेद निर्माण करणारे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज आहे.

पवार यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही.  विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे नुकसान होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण प्रश्नावर आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर  आम्ही चर्चा करू. सर्वांना सोबत घेऊन चर्चा करूनच आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असे थोरात यांनी सांगितले.

हे वर्ष नैर्सिगक संकटाचे असून मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे पंचनामे आल्यावरच मदतीबाबत ठरवले जाईल.