जामीन मिळाल्याशिवाय आपल्याला झालेल्या स्तनाच्या कर्करोगावर कोणतीही शस्त्रक्रिया अथवा उपचार करून घेणार नाही, अशा आशयाचे एक पत्र मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. या पत्रामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) पंचाईत झाली आहे.
कर्करोगावर उपचार मुंबईत करायचे की भोपाळमध्ये, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी प्रज्ञा सिंग हिला केली होती.
न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी साध्वीच्या या पत्राची गांभीर्याने दखल घेतली आहे. साध्वी मुख्य आरोपी असून तिच्यावर खटला चालावा व ती दोषी ठरून तिला शिक्षा व्हावी, असे वाटत असेल तर ती जिवंत राहाणे ‘एनआयए’साठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिला अंतरिम वैद्यकीय जामीन देण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने ‘एनआयए’ला केली. साध्वीच्या वतीने अ‍ॅड्. महेश जेठमलानी आणि गणेश सोवनी यांनी हा पर्याय सुचविला. न्यायालयाने तो योग्य असल्याचे नमूद करीत ‘एनआयए’ला त्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले. त्यावर असे करणे शक्य आहे की नाही हे माहिती घेऊन सांगू, असे विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ‘एनआयए’ला त्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी दिला आहे.
साध्वी सध्या भोपाळमधील तुरुंगात आहे. आरोग्यच्या कारणास्तव आपल्याला जामीन देण्याची विनंती साध्वीने न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने उपचार कुठे घ्यायचे, अशी विचारणा करीत साध्वीलाच पर्याय निवडण्याची संधी दिली होती. त्यावर साध्वीने सहा पानांचे पत्र न्यायालयाला लिहिले असून तिचे मेहुणे भगवान झा यांनी शुक्रवारी ते न्यायालयात सादर केले. भोपाळ तुरुंग अधीक्षकांनी हे पत्र झा यांच्यामार्फत पाठवले आहे.