जयेश शिरसाट, मुंबई

अद्ययावत यंत्रणेसाठी आयआयटीशी चर्चा

अवघ्या पाच महिन्यांमध्ये बेदरकार वाहन चालवून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या साडेचार लाख वाहनचालकांवर दंड आकारल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांकडे वळवला आहे. शहरात पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही तर सुमारे ६० स्पीड कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही, स्पीड कॅमेऱ्यांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वार दिसला रे दिसला की परस्पर त्याचे छायाचित्र काढून ई-चलन तयार करण्याची यंत्रणा जोडण्याचा विचार वाहतूक पोलीस करत आहेत. त्यासाठी सध्या आयआयटीतील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा सुरू असल्याचे समजते.

वाहनांचा वेग मोजणारे ६० स्पीड कॅमेरे वांद्रे-वरळी सागरी सेतू, पूर्व मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मरिन ड्राइव्हसह शहरातील अन्य प्रमुख मार्गावर बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे टप्प्यात आलेल्या वाहनाचा वेग मोजतात. तो मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधित वाहनाचे छायाचित्र टिपून वाहतूक पोलिसांच्या वरळी येथील मुख्यालयातील सव्‍‌र्हरला पाठवतात. या छायाचित्रात ठिकाण, वेळ, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि छायाचित्र टिपले तेव्हा वाहनाचा वेग असे तपशील असतात. या तपशिलांआधारे वाहतूक पोलीस संबंधित वाहन मालकाला ई-चलन धाडून दंड आकारतात. यंदा नववर्षच्या स्वागतापासून वाहतूक पोलिसांनी स्पीड कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर सुरू केला. या पाच महिन्यांमध्ये स्पीड कॅमेऱ्यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या चार लाख ४९ हजार २५९  वाहनांना पकडले. या सर्वाना ई-चलन धाडण्यात आले.

वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार वेगमर्यादा पाळणे हा प्रमुख नियम आहे. वेगामुळे जास्त अपघात घडतात. त्यात जीवितहानीही मोठय़ा संख्येने होते. ती रोखणे आणि बेशिस्त चालकांवर कारवाईचा धाक निर्माण करणे हा स्पीड कॅमेऱ्यांचा प्रभावी वापरामागील उद्देश आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये स्पीड कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त, बेदरकार वाहनचालकांवर धडक कारवाई केली गेली. या कारवाईचा परिणाम असा घडला की शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाताना बहुसंख्य चालक वेगमर्यादा पाळू लागले आहेत. त्यामुळे अलीकडे किंवा या महिन्यात जानेवारीच्या तुलनेत वेगमर्यादा ओलांडणाऱ्या चालकांवरील कारवाई कमी आढळते.

वेगमर्यादेनंतर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, असे कुमार यांनी स्पष्ट केले. जी यंत्रणा अस्तित्वात आहे त्यालाच अद्ययावत करून शहराच्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविणारा दिसला की त्याचे छायाचित्र आणि तपशील मुख्यालयाला मिळू शकतील. त्याआधारे चलन धाडून दंडात्मक कारवाई करणे शक्य होईल.

अनेकदा मुख्य रस्ते सोडल्यास आतील, छोटय़ा रस्त्यांवर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली जाते. अनेक चालक दुचाकी चालवताना हेल्मेट डोक्यावर न चढवता हातात बाळगतात, मागे बसलेल्याकडे देतात किंवा दुचाकीवर अडकवतात. कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा चालकांवरही आता कारवाई शक्य आहे. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक पोलीस या यंत्रणेसाठी आयआयटीतील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करत आहेत. कुमार यांनी या माहितीस दुजोरा दिला.

,४९,२५९

वाहनचालकांवर वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांत दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसाला तीन हजार या सरासरीने विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या स्पीड कॅमेऱ्यांनी त्यांना ‘टिपले’.

,४८,९०२

वाहनचालकांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांत ई चलन बजावण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील दृश्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

५१७०

शहरात लागलेल्या शासकीय सीसीटीव्हींची संख्या. ज्याचे चित्रण पोलीस, पालिकेसह वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अहोरात्र न्याहाळले जाते आणि त्याआधारे कारवाई केली जाते.

६०

स्पीड कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात असून ते वांद्रे-वरळी सागरी सेतू, पूर्व मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मरिन ड्राइव्हसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर बसविण्यात आले आहेत.