साडेसहा लाखांचा दंड वसूल

मुंबई : एका बाजूला पालिकेने तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली असली तरी विनामुखपट्ट्या फिरणाऱ्यांविरोधातील कारवाई मात्र रोडावली आहे. सोमवारी दिवसभरात संपूर्ण मुंबईतून जेमतेम साडेतीन हजार लोकांविरोधात मुखपट्ट्या न लावल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. दिवसभरात ३,४३४ नागरिकांकडून ६ लाख ८६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फेब्रुवारीत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पालिकेने मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्याही वाढविण्यात आली. दररोज २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेचे क्लिन अप मार्शल व पोलीस आणि रेल्वे हद्दीतही मोठ्या संख्येने ही कारवाई कडक केली. आता मात्र रुग्णसंख्या जसजशी कमी होऊ लागली तसतशी ही कारवाई कमी होऊ लागली. एका बाजूला नागरिकांना दोन मुखपट्ट्यांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरोधातील कारवाई मात्र कमी झाल्याचे चित्र आहे. तर टाळेबंदीमुळे रेल्वे परिसरातील कारवाई पूर्णत: थांबली आहे.

दरम्यान, मुलुंडमध्ये एका दिवसात केवळ ६ नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर देवनार, गोवंडीत के वळ १३ जणांकडून दंड वसूल के ला आहे. तर सर्वाधिक कारवाई वडाळा, सायनचा भाग असलेल्या एफ उत्तर विभागातून ३५३ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.