संतोष प्रधान

राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या मूळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वा इंदिरा काँग्रेसला प्रथमच राज्य विधानसभेत कोणतेही पद भूषविण्याची संधी मिळालेली नाही.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागा मिळाल्या. २०१४च्या तुलनेत दोन जागा जास्त असल्या तरी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर मागे फेकला गेला. ५४ जागा मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असून, विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली आहे.

राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेस पक्षाचा पगडा होता. १९६० ते १९७८, १९८० ते १९९५, १९९९ ते २०१४ या काळात मुख्यमंत्रिपद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा इंदिरा काँग्रेस पक्षाकडे होते. १९७७ नंतर काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर किंवा जनता लाटेतही दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व निवडणुकीत होते. १९७८ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ६९, तर इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा संघटना काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. जनता पक्षाच्या साहाय्याने शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केल्यावर इंदिरा काँग्रेसच्या प्रभा राव या विरोधी पक्षनेतेपदी होत्या. पुढे काही काळ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली.

१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यावर काँग्रेसचे मधुकरराव पिचड हे विरोधी पक्षनेते होते. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावरही १५ वर्षे मुख्यमंत्रिपद मूळ काँग्रेसकडेच होते. २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर राधाकृष्ण विखे आणि विजय वडेट्टीवार या इंदिरा काँग्रेसच्या दोघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याने राज्याच्या स्थापनेनंतर विधानसभेत इंदिरा काँग्रेसला प्रथमच कोणत्याही पदाविना विरोधात बसावे लागणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद नसले तरी निदान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असा आता काँग्रेसचा प्रयत्न आहे.

काँग्रेसपेक्षा कमी जागा लढवूनही राष्ट्रवादीला जास्त जागा आणि मतांची टक्केवारी जास्त मिळाली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काँग्रेसला मागे टाकून मुख्य पक्ष म्हणून पुढे येण्याची राष्ट्रवादीची योजना प्रत्यक्षात आली.

तीन राज्यांमध्ये फुटीरांनी काँग्रेसला मागे टाकले

काँग्रेस पक्षात बंड किंवा काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडलेल्यांपैकी तीन राज्यांमधील नेत्यांनी इंदिरा काँग्रेसला मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्रिपदी आहेत. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्याची प्रथमच संधी मिळाली आहे.

काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. आत्मपरीक्षण करून पक्षसंघटन मजबूत करावे लागेल.

– अनंत गाडगीळ, प्रवक्ते, काँग्रेस