महाराष्ट्राच्या अनेक भागांत दुष्काळ व अवकाळी पाऊस पाचवीला पूजलेला. दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या काढण्याच्या घोषणा होत असल्या तरी चाऱ्याअभावी जनावरांच्या होणाऱ्या हालाला पारावर नसतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कमीत कमी पाणी आणि ‘मातीविना शेती’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नगदी पिके घेण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आणि ८२ टक्के कोरडवाहू शेती यामुळे चारा पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी विभागाने ‘हायड्रोपोनिक’ तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याच्या निर्मितीची योजना तयार केली आहे. या चारानिर्मितीसाठी जागा कमी लागते तसेच कमीत कमी पाण्याचा वापर करून सातत्याने चारा उत्पादन घेता येते. या चाऱ्यात जास्त प्रोटिन तर असतेच शिवाय उत्पादनही जास्त प्रमाणात होते. सामान्यपणे चारा तयार होण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो तर हायड्रोपोनिक तंत्राद्वारे सात दिवसांत चाऱ्याची निर्मिती करता येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीशिवाय याचे उत्पादन करता येत असून केवळ ५० चौरस मीटर क्षेत्रात चारानिर्मिती करता येते.
एक किलो मका अथवा गव्हापासून दहा किलो चार तयार होत असून एका गायीला १५ किलो चारा लागतो हे गृहीत धरल्यास अत्यल्प खर्चात व कमी घरच्या घरी चारा करणे शक्य होणार आहे.

काय करावे..

’हंगामानुसार मका, गहू किंवा बाजरीचे बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजत ठेवावे.
’ त्यानंतर बियाण्याला मोड आणण्यासाठी १२-१४ तास पोत्यात अथवा सूती कपडय़ात गुंडाळून ठेवावे.
’ दोन फूट लांब-रुंद ट्रेमध्ये ४००-५०० ग्रॅम बियाणे पसरून ठेवावे.
’एका खोलीत अथवा चारी बाजूने आडोसा तयार केलेल्या जागेत बांबूच्या साहाय्याने एकावर एक असे चार-पाच कप्पे करून त्यामध्ये हे ट्रे दहा दिवस ठेवावे.
’ या काळात आवश्यकतेनुसार थोडा पाण्याचा शिडकावा करावा.
’दहाव्या दिवशी दहा इंच उंचीचा हायड्रोपोनिक वैरण तयार होते.