लोकल प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांचा नियमभंग; स्थानकांत तपासणी होत नसल्याने निर्धास्त प्रवास

मुंबई : कसारा, डहाणूपर्यंतच्या प्रवाशांना कमी वेळेत जलद प्रवास घडवून आणणाऱ्यालोकल सेवेवरील निर्बंधांमुळे अनेक हतबल प्रवाशांचा विनातिकीट प्रवासाकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवासावर असलेल्या निर्बंधांमुळे तिकीट खिडकीवर तिकीट वा पास मिळत नाही. दुसरीकडे टॅक्सी-बस वा खासगी वाहतुकीसाठी लागणारा वेळ व प्रवास खर्च परवडत नाही. म्हणून पश्चिम आणि मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्याप्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तर काही प्रवाशी बनावट ओळखपत्राचा आधार घेत आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वा ज्यांना परवानगी आहे अशा महिला, अपंग आदी श्रेणीतील प्रवाशांनीच प्रवास करावा यासाठी रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांजवळ रेल्वे पोलिसांकडून होणारी तपासणी थांबवण्यात आली आहे. तिकीट खिडकीवर केवळ परवानगी असलेल्यांनाच तिकीट किं वा पास मिळतो. त्यामुळे विनातिकीटच अनेक जण रेल्वे प्रवासाचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर जून ते डिसेंबरपर्यंत ७४ हजार विनातिकीट प्रवासी आढळले. तर मध्य रेल्वेवर या काळात ३५० बनावट ओळखपत्रे पकडण्यात आली. सध्या या दोन्ही मार्गांवरून प्रत्येकी सात लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यापासून लोकल प्रवास सुरू होताच स्थानकातील प्रवेशद्वारांजवळ लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच तिकीट तपासनीसही होते. ओळखपत्र, तिकीट तपासून स्थानकात प्रवेश दिला जात होता. आता फक्त तिकीट खिडक्यांवर तिकीट देतानाच ओळखपत्र दाखवावे लागते. परिणामी स्थानकात सहज प्रवेश मिळतो. असेही तिकीट किं वा पास मिळणार नाही तर बिनदिक्कतपणे विनातिकीट प्रवास करू याकडे प्रवाशांचा कल असल्याचे मध्य रेल्वेवरील एक तिकीट तपासनीसाने सांगितले. त्यामुळे लोकलनाही  गर्दी वाढू लागली आहे. दुसरीकडे रेल्वेकडे दंड जमा होत असला तरी तिकीट-पासाचा महसूल बुडतो, याकडे या तपासनीसाने लक्ष वेधले.

बनावट ओळखपत्रांकरवी प्रवास

पंधरा दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवर २०० बनावट ओळखपत्रे पकडण्यात आली होती. हीच संख्या आता ३५० पर्यंत पोहोचली आहे. तर याप्रकरणी मध्य रेल्वेवर सात गुन्हे दाखल झाले असून पश्चिम रेल्वेवर आठ गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

महिला प्रवाशांकरवी तिकीट

तिकीट खिडकीवर ओळखपत्र दाखविल्याशिवाय प्रवास करता येत नसल्याने अनेक पुरुष प्रवासी अन्य महिला प्रवाशांकरवी तिकीट मिळवत आहेत. सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर प्रवासाची मुभा आहे.